राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यात 15 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही. त्यामुळे राज्यात 30 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
राज्यात काही जिल्ह्यामधील परिस्थिती सुधारत असली तरी काही जिल्ह्यात मात्र कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक पाळतीवर लॉकडाऊनची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. त्यात रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.
नाशिक शहरात 12 मे पासून पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 तारखेला दुपारी 12 ते 22 तारखेच्या दुपारी 12 असे 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात रुग्णालये आणि औषधी दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलीय.