भारतीय क्रिकेट संघाने दिवाळीच्या मूहूर्तावर टी20 विश्वचषकाच्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. आधी दमदार फलंदाजीने मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत भारतीय संघाने 210 धावांचां डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला.
पहिल्या दोन्ही सामन्यात भारत दारुण पराभूत झाला होता. आधी पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज मात्र भारत आपल्या जुन्या रंगात परत आला. एका मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे. यावेळी रोहित-राहुल जोडीने उत्तम सलामी देत एक मोठी भागिदारी केली. ज्यानंतर शमी, आश्विन, बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला कमी धावसंख्येत रोखलं. या विजयामुळे भारतीय संघासह सर्व देशवासी आनंदी झाले आहेत.
सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने इतर बहुतांश संघ यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांना चूकीचा ठरवत धडाकेबाज फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित पाठोपाठ राहुलही बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा केल्या.
211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. पण भारताचं 211 धावांचं मोठं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला. भारताकडून सर्वाधिक विकेट्स शमीने घेतल्या. त्याने 3 गड्यांना बाद केलं. तर आश्विनने 2, बुमराह आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.