‘अव्वल १२’ फेरीत अखेरचा सामना आज झिम्बाब्वेशी; रोहित शर्माकडे नजरा
भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध रविवारी होणाऱ्या अखेरच्या ‘अव्वल १२’ फेरीतील सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडूनही मोठय़ा खेळीची अपेक्षा असणार आहे.
रोहितच्या कामगिरीकडे लक्ष
भारताच्या आघाडीच्या फळीत विराट कोहली चांगल्या लयीत आहे. तर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी काही निर्णायक खेळी केल्या आहेत. रोहितला मात्र अजूनही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने स्पर्धेतील चार सामन्यांत केवळ ७४ धावा केल्या आहेत. नेदरलँड्स विरुद्धचा सामना सोडल्यास रोहितला स्पर्धेत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या लढतीत विराट कोहलीने संस्मरणीय खेळी केली होती, मात्र झिम्बाब्वेविरुद्धचा सामनाही भारतासाठी महत्त्वपूर्ण असेल. या सामन्यात भारताला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
सिकंदर रझाचे आव्हान
रेजिस चकाब्वाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. झिम्बाब्वेने स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती, मात्र ती लय त्यांना कायम राखता आली नाही. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना अजूनही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. झिम्बाब्वे संघात क्रेग एर्विन, सीन एर्विन, रायब बर्ल आणि सीन विल्यम्ससारखे फलंदाज आहेत. भारतासमोर सिकंदर रझा आव्हान उपस्थित करू शकतो. भारत-झिम्बाब्वे यापूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. तरीही, त्यांना स्पर्धेत पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत केल्याने भारतीय संघ त्यांना हलक्याने घेणार नाही.
कसे असेल गटाचे समीकरण
या सामन्यातील विजय भारताला गटात शीर्ष स्थानी पोहोचवेल, पण भारत पराभूत झाल्यास पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असेल. पाकिस्तानने बांगलादेशला अंतिम सामन्यात पराभूत केल्यास चांगल्या निव्वळ धावगतीच्या आधारे ते आगेकूच करू शकतात. दक्षिण आफ्रिकेचा संघही पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवल्यास संघ पुढच्या फेरीत पोहोचेल. मात्र, ते पराभूत झाल्यास आणि पाकिस्तान जिंकल्यास भारत व पाकिस्तान अंतिम चार संघांत स्थान मिळवू शकतात.
- वेळ : दुपारी १.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या )