12,500 व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंना खास भेट; अभिनेत्याची पद्म पुरस्कारासाठी शिफारस
मराठी रंगभूमी गाजवलेल्या नट म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाटक घराघरात पोहचवलेला, मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले. गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर चालणारच, ही खात्री निर्मात्याला असतेच असते. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. येत्या ६ नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात ते १२,५०० व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठणार आहेत. हे नाटक आहे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’. एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं. रंगभूमीवरील त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. नाटकाच्या १२,५०० व्या प्रयोगासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलेंच्या नाटकाचा १२,५०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी खास महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांच्या वतीने अभिनेते प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने अशी मागणी केली गेली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आधीच त्यांच्या नावाची शिफारस केली आहे असं उत्तर दिले. मराठी प्रेक्षकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.
पुण्यात देशातील सर्वात मोठा नैसर्गिक गवताचा गालिचा निर्मिती, रोजगारासह आहेत फायदे
सध्या वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाची चर्चा केली जाते. त्यामुळे म्हणून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण हे दोन्ही मुद्दे लक्षात घेता देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाचा प्रसार व्हावा. यासाठी या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती केली आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी 1000 स्क्वेअर फुट गालिच्याची निर्मिती केली आहे. या गालिच्याची जागतिक स्तरावरही नोंद करण्यात आली आहे. प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये नैसर्गिक रित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालिचा तयार करण्यात आला आहे.
ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांची दोन वाक्यात प्रतिक्रिया
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून निवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून यात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, या निकालाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांना अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत विचारले असता, त्यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “या निवडणुकीत राजकीय संस्कृती म्हणून आमच्या युतीने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियाची पुन्हा एकदा दमदार बॅटिंग
पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. मात्र, हा आत्मविश्वास धुळीस मिळवण्याचे काम भारतीय संघाने रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) केले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या टी २० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा म्हणजेच ४२ वा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना भारताने ७१ धावांनी आपल्या नावावर केला. आता भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल.
टांझानियात ४३ जणांना घेऊन जाणारं विमान तलावात कोसळलं
टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान ४३ जणांना घेऊन जात होतं. पण खराब हवामानामुळे हे प्रवासी विमान तलावात कोसळलं आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलीस दल आणि बचाव दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमानातील प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
सत्तेत आल्यास ‘समान नागरी कायदा’ लागू करू, हिमाचल प्रदेशच्या जनतेला भाजपाचे मोठे आश्वासन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार तसेच पक्षांकडून वेगवेगळी आश्वसने दिली जात आहेत. दरम्यान हिमाचलप्रदेशमधील मतदान अवघे आठवड्यावर आलेले असताना येथील भाजपाने मोठे आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेत आलो तर ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा लागू करू, असे आश्वासन भाजपाने येथील मतदारांना दिले आहे.
सुषमा अंधारे Vs चित्रा वाघ; शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला भाजपचं प्रत्युत्तर
शिवसेनेकडून 10 ऑक्टोबरला महाप्रबोधन यात्रा सुरू झाली. ही यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली. या यात्रेत सुषमा अंधारेच्या नेतृत्त्वात राज्यात सभा झाल्या. तर यानंतर आता भाजपकडूनही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात येणार आहे.
तीन दिवसांपूर्वीच भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी आवाज दिलेल्या चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले
ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास चालणार नाही. मराठा लाईट इनफन्ट्री च घोषवाक्य हर हर महादेव आहे. त्याचा अपमान नको. तसेच वेडात मराठे वीर दौडले सातचा फोटो बघा. गाठ संभाजी छत्रपतींशी आहे, हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार का नाही? अंधेरीच्या निकालानंतर ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत.’ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ मोठ्या घोषणा करत असतं. कालपर्यंत गुजरातच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रातील जमीनवर काही प्रकल्प ठरले होते, पण हे प्रकल्प महाराष्ट्रातून ओरबाडून नेण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांना महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलंय. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्राकडे दिले आहेत. या घोषणांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात’, असा अंदाज उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
SD Social Media
9850 60 3590