राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलंय. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचं भवितव्य मतपेटीत कैद झालंय. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी रविवारी 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. परंतु या निकाल लागण्यास रात्र उजाडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोरोनामुळे 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळेच निकाल येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, या निवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केलेय. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्वतयारीबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक अरुण पवार उपस्थित होते.