जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा करण्यावरून चक्क दोन पुजारी कुटुंबामध्ये भयंकर राडा झाला. त्यांनी चक्क गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले. कालपर्यंत चक्क मुखी रामनाम असणारे आज असे एकदम आक्रमक झालेले पाहून ते चाट पडले. करणार काय. सारा मायेचा खेळ. फक्त यातून जे आता भाविकांनी काय बोध घ्यायचा, तो ज्यांनी-त्यांनी ठरवावे.
त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. येथे हजारो वर्षांपासून पूजापाठ सुरू आहे. यातली सर्व कुटुंब मराठी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीय तरुण आणि पुजाऱ्यांनी त्र्यंबकनगरीत आपले बस्तान बसवले आहे. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वादविवाद सुरू असतात. आता या प्रकरणाचे झाले असे की, नागपूरचे एक भाविक आलेले. त्यांना कालसर्प पूजा करायची होती. त्यासाठी भांडण करणाऱ्यांपैकी एका पुजाऱ्याने 11 हजार रुपये सांगितलेले. इतकी रक्कम ऐकुण भाविक गांगारले. साहजिकच त्यांनी दुसऱ्याकडे धाव घेतली. भांडण करणाऱ्या दुसऱ्या पुजाऱ्याने ही पूजा कमी रकमेत केली. त्यामुळे दोन्ही पुजाऱ्यांमध्ये भांडण जुंपले. दोघेही पंचवटीतल्या हिरावाडीमध्ये राहतात. त्र्यंबकेश्वरमधून येताना वादावादी झाली. ही दोन्ही कुटुंबे हिरावाडीत आल्यानंतर चक्क तुंबळ हाणामारी रंगली. त्यामुळे परिसरातील लोकही आश्चर्यचकित झाले.
याप्रकरणी बीट मार्शल सागर पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही दोन्ही कुटुंबे हिरावाडी येथे तलवारी, चाकू, हॉकीस्टीक हातात घेऊन एकमेकांना भिडले. गस्तीवर असलेल्या पांढरे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकले नाही. पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी सुरू केली. ही दोन्ही कुटुंबे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातून आलेल्या भाविकांची कालसर्प पूजा करून देतात. त्यावरून दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून वाद असल्याचे समजते.
पोलिसांनी याप्रकरणी वीरेंद्र हरिप्रसाद त्रिवेदी, आशिष वीरेंद्र त्रिवेदी, मनीष वीरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्यप्रसाद तिवारी, आकाश नारायण त्रिपाठी, अनिकेत उमेर तिवारी, सचिन नागेंद्र पांडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.