महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? 20 आमदार बंडाच्या तयारीत!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. सत्ताधारी शिवसेना भाजप विरोधी पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वात उद्धव ठाकरेंविरोधात यशस्वी बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय. जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या 20 आमदारांमध्ये कोण कोण आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.दोन आठवड्यात या घडामोडी घडतील असं सरकारच्या निकटवर्तीय वर्तुळातून सांगितलं जातंय.फुटणारे आमदार काँग्रेसचेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राष्ट्रवादीचे आमदार फुटले तर त्यांचं नेतृत्व कुणाकडं असेल याचीही चर्चा सुरु आहे. सरकार कोसळल्यानंतर विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीत आमदारांची घुसमट सुरू झालीय. दुसरीकडे तपास यंत्रणांनी आमदारांच्या संस्था आणि सहकारी कारखान्यांची झाडाझडती सुरु केली आहे, त्यामुळे ही चर्चा फक्त चर्चा राहते, की राजकीय भूकंप होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त गंभीर जखमी
बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे. संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना संजय जखमी झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता. याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. या बातमीनंतर संजयचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
नंदलाल झा शरीरसौष्ठवमध्ये सर्वश्रेष्ठ
मिरजेत झालेल्या तिसर्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या नंदलाल झा यांने भारत सर्वश्रेष्ठ किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यातील दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते.
श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या एसबीजीआय क्रीडांगणावर झालेल्या दोन दिवसांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये विविध गटातून स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले. अॅम्युॅच्यूअर बॉडीबिल्डिंग असोसिएशन, फिसिक स्पोर्टस फेडरेशन आणि महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्यावतीने या स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले होते.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांवर लादला नवा नियम; ‘या’ ठिकाणी जाण्यास घातली बंदी
अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या उच्च शिक्षणांवर निर्बंध घातल्यानंतर तालिबानने महिलांविरोधात आणखी एक नवा नियम लादला आहे. या नव्या नियमानुसार, हेरात प्रांतातील बाग किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलांना जाता येणार नाही. महिलांना आपल्या कुटुंबियांसोबत देखील या ठिकाणी येण्यास बंदी घातली आहे.असोसिएटेड प्रेसने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अशा ठिकाणांवर दोन भिन्न लिंगांची सरमिसळ होते. त्यामुळे अफगाणिस्तानमधील धार्मिक विद्वान आणि लोकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात सोमवारपासून (११ एप्रिल) तालिबान सरकारने कुटुंबांसह महिलांना बाग किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.
H3N8 बर्ड फ्लूच्या पहिल्या मृत्यूची नोंद, मासळी बाजारातून आल्यानंतर विषाणूची लागण
करोनासह जगभरात आता आणखी एका विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. कारण, मानवापासून लांब असलेल्या H3N8 बर्ड फ्लूमुळे पहिला मानवी मृत्यू झाला आहे. चीनमधील ५६ वर्षीय महिलेला एवियन इन्फ्लूएंजच्या सब टाइप H3N8 ची लागण झाली होती. या विषाणूची लागण होणारी जगभरातील ही तिसरी महिला होती. तिचं १६ मार्च रोजी निधन झालं.‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील या महिलेला २२ फेब्रुवारी रोजी ताप आला होता. आजार बळावल्याने तिला ३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर, १६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सदर महिलेला इतर बरेच आजार होते. तसंच, ती पक्ष्यांच्या सान्निध्यात आली होती. परंतु, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यावेळी स्पष्ट होऊ शकलं नव्हतं, असंही WHO ने म्हटलं आहे.
भारताने लेहमध्ये आयोजित केली जी-२० बैठक; चीनची भूमिका काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले असताना आता भारताने त्याही पुढचे पाऊल टाकले आहे. यंदाचे जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळाले असून, पुढील जी २० परिषदेची बैठक लेहमध्ये आयोजित केली आहे. सीमावादावरून चीनने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे.यंदा जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. भारतात विविध ठिकाणी बैठकांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. असं असतानाच दुसरीकडे भारत-चीन सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातच २६ ते २८ एप्रिलदरम्यान लेहमध्ये जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला ८० देश सहभागी होणार आहेत. परंतु नेमके कोणते देश या बैठकीला हजर राहणार आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी अरुणाचल प्रदेशची राजधानी असलेल्या इटानगर येथे जी-२०च्या प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला चीनने बहिष्कार घातला होता. त्यामुळे आगामी बैठकीलाही ते बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात वयस्कर अब्जाधीश केशब महिंद्रांचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन
भारतातले सर्वात वयस्कर अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका केशब महिंद्रा यांचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झालं आहे. केशब महिंद्रा यांच्या निधनाची माहिती INSPACe चे अध्यक्ष पवन गोएंका यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गोएंका यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, उद्योग जगातील सर्वात महान व्यक्तीला त्यांनी गमावलं आहे. महिंद्रा यांना भेटणं नेहमीच उत्साह वाढवणारं असतं. ते नेहमी व्यवसाय, अर्थकारण आणि सामाजिक गोष्टींची उत्तम प्रकारे सांगड घालायचे.फोर्ब्सने जारी केलेल्या २०२३ च्या अब्जाधीश भारतीयांच्या यादीत केशव महिंद्रा यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांचं नाव १६ नव्या अब्जाधीशांच्या यादीत होतं. ते तब्बल ४८ वर्ष महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या अध्यक्षपदी होते. २०१२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं. फोर्ब्सच्या बिलेनियर्स लिस्टनुसार केशब महिंद्रा १.२ बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती मागे ठेवून गेले आहेत.
करोना पुन्हा वाढतोय, आज आठ हजार बाधितांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार
गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात सात हजार ८३० करोनाचे नवे रुग्ण सापडले असून, ही आकडेवारी गेल्या २२३ दिवसांतील सर्वाधिक आकडेवारी आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात आता सक्रिय करोना रुग्णांचा आकडा ४० हजार २१५ झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दोन लाख १४ हजार २४२ करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३.६५ टक्के म्हणजेच ७,८३० जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, गेल्या २४ तासांत १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण पाच लाख ३१ हजार १६ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात सध्या मृतांचे प्रमाण १.१९ टक्के आहे.
म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक, लहान मुलं, पत्रकारांसह १०० जणांचा मृत्यू
म्यानमार सैन्याने मंगळवारी (११ एप्रिल) एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी ८ वाजता १५० लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश आहे.
धोनीसाठी आजचा दिवस खास, मैदानात पाऊल ठेवताच करणार रेकॉर्ड
जगप्रसिद्ध आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून आज आयपीएलमधील 17 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना पारपडणार असून आजचा सामना चेन्नईचा कर्णधार असलेल्या एम एस धोनीसाठी अत्यंत खास ठरणार आहे.
एम.एस.धोनी हा आयपीएल 2023 मधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने तब्बल 4 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 31 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. आज चेन्नईचा संघ चेपॉक स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना खेळणार असून हा सामना धोनीच्या नेतृत्वातील 200 वा सामना असणार आहे.
SD Social Media
9850 60 3590