सूर्यावर मोठ्या प्रमाणात वादळं येत असतात. त्यांनाच सौरवादळं म्हणतात. बहुतांश वेळा या वादळांचा पृथ्वीवर तेवढा परिणाम होत नाही. पृथ्वीवर परिणाम होण्याइतपत मोठी सौरवादळं शक्यतो काही दशकांनंतर एकदा होतात. आताही असंच एक मोठं सौरवादळ येणार असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या सौरवादळामुळे पृथ्वीवरची इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
नासा या अमेरिकन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सौरवादळांची गती साधारणपणे 10 ते 20 लाख मैल प्रति तास एवढी असते. सूर्याच्या कोरोनल होल्समधून ही वादळं तयार होतात. सूर्यावर सतत होत असणाऱ्या विस्फोटांमुळे ही वादळं तयार होतात. या वादळांसोबतच सूर्यातून निघालेले रेडिएशन चार्ज्ड पार्टिकल्सही पृथ्वीच्या दिशेने येतात. हे पार्टिकल्स अत्यंत वेगाने प्रवास करत असतात. पृथ्वीजवळ आल्यानंतर इथल्या चुंबकीय क्षेत्राला हे पार्टिकल्स धडकतात. यातूनच मग ध्रुवांवरून आकाशात दिसणारा विविधरंगी प्रकाश तयार होतो. याला ‘ऑरोरा’ किंवा नॉर्दर्न लाइट्स म्हणतात.
या सौरवादळांमुळे पृथ्वीच्या बाहेरचं वातावरण अगदी उष्ण होतं. यामुळे थेट पृथ्वीवर तेवढा परिणाम दिसत नसला, तरी पृथ्वीच्या कक्षेत फिरत असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर आणि स्पेस स्टेशनवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो. यामुळे जीपीएस नॅव्हिगेशन, मोबाइल सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्ही इत्यादी गोष्टींवर परिणाम होतो. तसंच, अवकाशातले ट्रान्सफॉर्मर्स निकामी होण्याचीही शक्यता असते.
यापूर्वी 1859 आणि 1921 साली अशी मोठ्या स्वरूपाची सौरवादळं झाली होती. 1859मधल्या जिओमॅग्नेटिक वादळामुळे तर युरोप आणि अमेरिकेतलं टेलिग्राफ नेटवर्क उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्या काही वर्षांनंतर, म्हणजेच, 1889 मध्येही एक कमी तीव्रतेचं सौरवादळ आले होते. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आता होणारं सौरवादळ हे या सर्वांच्या तुलनेत अधिक मोठे असेल. तसंच, याचा परिणामही अधिक तीव्र असणार आहे.