जळगाव जिल्ह्यातील धरणगावात मिळाला ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख

जळगाव येथील धरणगावमधील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात इमारतीची दुरूस्ती करत असताना एक शिलालेख प्राप्त झाला. हा ऐतिहासिक ठेवा आज समोर आला असून हा ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव येथील इतिहास संशोधक व हेरीटेज फाउंडेशनचे संचालक भुजंगराव बोबडे, राज्य कर उपायुक्त समाधान महाजन व चाळीसगाव येथील सुशीलकुमार अहिरराव यांच्या टीमने त्याची पाहणी व वाचन पूर्ण करून ही माहिती कळविली. या वेळी धरणगाव येथील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे देखील उपस्थित होते.

इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांनी सांगितलं की, धरणगावमध्ये मिळालेला मराठी शिलालेख 15 ओळींचा असून इंग्रजी शिलालेख 18 ओळींचा आहे. हे दोन शिलालेख प्राप्त झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनाही कळविण्यात आली.एक शिलालेख मराठी देवनागरीत असून, दुसरा रोमन लिपीत व इंग्रजी भाषेत आहे, असं बोबडे यांनी सांगितलं.

ह्या जागी लेफ्टनंट औट्राम हे पुढे लेफ्टनंट जनरल सर जेम्स औट्राम जी. सी. बी. बी. बार्ट. डी. सी. एल. इत्यादि, या नावाने प्रसिद्धीस आले. यांचा राहण्याचा बंगला होता व ते या बंगल्यात सन १८२५ पासून १८३५ पर्यंत रहात होते. हे गृहस्थ त्या वेळी २३ व्या मुंबईच्या देसी पायदळ पलटणीत लेफ्टनंटच्या हुद्दयावर असून त्यास खानदेश जिल्ह्याच्या ईशान्य भागाचे भिल एजंट नेमिले होते. व त्यांनी आपल्या सदर ठाण्याच्या जागेसाठी धरणगाव पसंद केले होते. त्या वेळेचे भिल जातीचे लोक बेबंद लुटारू असल्यामुळे कायदा व व्यवस्था राखण्यासाठी त्या लोकांची एक हत्यारबंद फौजेची तुकडी तयार करण्याचे काम लेफ्टनंट औट्राम यांजकडे सोपवून दिले होते. त्यांच्या आंगचे गुण त्यांचा ममताळूपणा आणि त्यांचे शिकारीसंबंधीचे धाडस व युक्ती यांच्या योगाने त्यांनी या रानटी लोकांचे प्रेम संपादन करून त्यापैकी सुमारे ७०० इसमांची एक तुकडी बनविली आणि ती त्यांनी आपल्या नेमणुकीच्या तारखेपासून दोन वर्षाच्या अवधीत फारच तरबेज केली. त्यांना पुढे हिंदुस्थानचा बेयर्ड निष्कलंक व निर्दोष सरदार ही पदवी ज्या कीर्तीमुळे प्राप्त झाली त्या कीर्तीचा पाया त्यांनी या ठिकाणी घातला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.