शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री,
गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता
उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी जाहीर केल्यानंतर नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेचा मूळ आक्षेप गृहखात्यावर असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील गृहखातं शिवसेनेला मिळाला तर आनंदच असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
माझा माझ्या सहकाऱ्यांवर
पूर्ण विश्वास : उद्धव ठाकरे
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. “अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दहा दिवसांत पेट्रोल डिझेल
६ रुपये, ४० पैशांनी महागले
इंधन दरवाढीचे सत्र कायम असून, गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलदरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली़ त्यामुळे गेल्या दहा दिवसांत इंधन ६ रुपये, ४० पैशांनी महागले आह़े. निवडणूक काळातील साडेचार महिन्यांच्या दरस्थिरतेनंतर २२ मार्चपासून पुन्हा इंधन दरवाढ सुरू करण्यात आली़ पेट्रोल आणि डिझेलदरात गुरुवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ११६. ७२ रुपये आणि डिझेल १००. ९४ रुपयांवर पोहोचल़े दिल्लीत पेट्रोल १०१. ८१ रुपये, तर डिझेल ९३. ०७ रुपयांवर पोहोचल़े.
१ एप्रिल २०२२ पासून
टोल टॅक्समध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला सरकारने आणखी एक झटका दिला आहे. १ एप्रिल २०२२ पासून सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील (NHAI) टोल करातही वाढ केली आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून टोल टॅक्समध्ये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय लागू झाला आहे. याचा थेट परिणाम मालाच्या वाहतुकीवर आणि सामान्यतः एका शहरातून दुस-या शहरात जाणाऱ्या कारस्वारांवर होणार आहे. जनतेला महागाईच्या दुहेरी तडाख्याला सामोरे जावे लागत आहे.
फर्रुखाबादचे नाव
बदलण्याची मागणी
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा भाजपाचे सरकार सत्तेत आलं आहे. एकीकडे बुलडोझरची कारवाई जोरात सुरू असताना दुसरीकडे ठिकाणांची नावे बदलण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत यांनी जिल्ह्याचे नाव बदलून पांचालनगर करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदाराने योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे.
श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, वीज
वाचवण्यासाठी पथदिवे बंद
श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या देशाला वीज वाचवण्यासाठी आपले पथदिवे बंद करावे लागत आहेत. एका मंत्र्याने गुरुवारी सांगितले की, दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटामुळे त्यांना पथदीवे बंद करायची वेळ आली आहे. लोडशेडिंगचा देशाच्या मुख्य शेअर बाजारावर परिणाम झाला असून व्यापाराला फटका बसला आहे. तर, दुसरीकडे देशात डिझेल संपल्याचंही वृत्त समोर आलंय. देशात आज डिझेल संपल्याने वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती मिळत आहे.
८० टक्के रशियन नागरिकांनी
केले पुतीन यांच्या कृतीचं समर्थन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे एकीकडे त्यांना जगभरातील अनेक देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत असताना देशात मात्र त्यांना फायदा झालेला दिसत आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले असताना देशातील जनता मात्र पुतीन यांच्या समर्थनार्थ आहे. Levada Centre ने केलेल्या सर्व्हेत ८० टक्क्यांहून जास्त रशियन नागरिकांनी पुतीन यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.
अनिल देशमुख यांच्या संदर्भातील
सरकारची याचिका फेटाळली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१ एप्रिल) राज्यातील ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. ठाकरे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधातील सीबीआय चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) हस्तांतरीत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत सरकारने विद्यमान सीबीआय संचालकच महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांना कारणीभूत असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारची ही याचिका फेटाळली आहे.
अल्संख्यांक मत मिळवण्यासाठी
चढाओढ : देवेंद्र फडणवीस
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायला नको होता, असं शरद पवार म्हणाल्याचं सांगत यावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी हसून, “अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्संख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागलीय त्यातून अशी वक्तव्य येतायत,” असा टोला लगावलाय.
शिक्षिकेचा अल्पवयीन
मुलाने केला विनयभंग
घरी शिकवणीस येणाऱ्या शिक्षिकेचा अल्पवयीन मुलाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. प्रसाधनगृहात मोबाइल संच ठेवून त्याद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून कर्वेनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुला विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिक्षिकेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
युद्धातून भारताला मोठी संधी, रशियात या भारतीय उत्पादनांची मागणी वाढली
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि जगातील अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादल्यामुळं आता रशियामध्ये भारतीय वस्तूंची मागणी झपाट्यानं वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी रशियामध्ये आपल्या विविध उत्पादनांची विक्री करण्याची ही मोठी संधी आहे. आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय देशांकडून रशियाला वाढीव प्रमाणात माल पाठवला जात होता. मात्र, रशियावर निर्बंध असल्यानं आता कोणताही देश रशियाला माल पाठवत नाही. अशा परिस्थितीत, रशियातील अनेक व्यावसायिक संस्थांनी भारतीय मालासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Cait) कडे संपर्क साधला आहे, तर भारतातील व्यापारी देखील भारतीय उत्पादनं रशियाला निर्यात करण्यास उत्सुक आहेत.
TATA च्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये
टाटा समूहाची कंपनी Tata Elxsi गेल्या वर्षी शेअर बाजारातील मल्टीबॅगर शेअर्समध्ये होती. अलीकडेच शेअरने NSE वर 9420 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. या शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना सुमारे 220 टक्के परतावा दिला आहे.टाटा एलेक्सी शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिल्यास दिसून येते की या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअरधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. गेल्या 13 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरून 8,850 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत सुमारे 20,700 टक्के वाढ झाली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी जळगावातील दर्ग्यावर चादर चढवून फेडला नवस
राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे कार्यकर्त्यांने केलेला नवस फेडण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी फैजपूर येथील हजरत बाबा दुलदुल शहा वली यांच्या दर्ग्यावर पोहोचले आणि येथे चादर चढवत कार्यकर्त्याने केलेला नवस आव्हाडांनी पूर्ण केला.
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL दरम्यान 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश
आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच, क्रिकेट प्रेमींसाठी यासंदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिलपासून 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आयपीएलच्या तिकीट भागीदार बुक माय शोने शुक्रवारी याची पुष्टी केली आहे.पहिल्या काही सामन्यांसाठी ही क्षमता 25 टक्के निश्चित करण्यात आली होती, ती आता वाढवण्यात आली आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात चार मैदानांवर खेळवली जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; आमदारांच्या नाराजीनंतर मोठा निर्णय
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे बोलून दाखवली आहे. अशात आता काँग्रेसचे तब्बल 25आमदार नाराज असल्याचंही समोर येत होतं. या आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली होती. यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. अशात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत असल्याचं समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबद्दल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे सहप्रभारी बी एम संदीप यांना करण्यात कार्यमुक्त करण्यात आलं आहे. तर, काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे.
SD social media
9850 60 3590