आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकारण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. ‘राख’ या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि’लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपनं हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं. राजेश चव्हाण यांनी या सायलेंट मुव्हीचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपनं साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ च्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या संदीपला मिळालेला हा पुरस्कार सर्वार्थानं त्यानं आजवर केलेल्या मेहनतीचं फळ आहे. एकीकडे विनोदी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना पोट धरून हसवताना संदीपनं दुसरीकडे धीरगंभीर भूमिका साकारत आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याचंही दर्शन घडवलं आहे. दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचं काम नेहमीच संदीपनं केलं आहे.