आज दि.१२ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

आशेच्या भांगेची नशा भारी! ‘या’ दिवशी रिलीज होणार नागराजची ‘घर बंदूक बिरयानी’

फँड्री, सैराट, नाळ, झुंड सारख्या दर्जेदार सिनेमांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या   झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे.सिनेमाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून सिनेमा मार्च महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

घर बंदूक बिर्याणी या सिनेमाच्या नावावरून सिनेमाची उत्सुकता सर्वांना होती.  सिनेमातून नागराज मंजुळे पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. फ्रँड्री, सैराट, नाळ सिनेमातून नागराजचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा घर बंदूक बिरयानीमध्ये नागराज अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सिनेमात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

फडणवीसांनी ठरवून ‘करेक्ट कार्यक्रम’ केला! 36 दिवसांपूर्वीच पेपर फोडला, काँग्रेसची नामुष्की

जून 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या राजकीय भुकंपानंतर जवळपास रोजच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे ट्वीस्ट येत आहेत. याचाच पुढचा अंक आता लिहिला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण ठरत आहे ते येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुका. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, यासाठी त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी आपण फक्त महाविकासआघाडीच नाही तर भाजपचाही पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा, साकारलं जगातील सर्वात मोठं रेखाचित्र!

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रेखाचित्र तयार करण्यात आलं आहे. शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर तब्बल 15 हजार स्क्वेअर फुटावर हे चित्र साकारले आहे. अतिशय भव्य असणारं हे अनोखं चित्र जगातील सर्वात मोठे असल्याचं सांगितले जात आहे. 

चित्रकार उदेश पथळ यांनी हे चित्र साकारले असून नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले व एनसीसी कैडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. अवघ्या 4 दिवसात हे रेखाचित्र पूर्ण करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होस दौऱ्यावर, सर्वाधिक १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून, आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत.याशिवाय पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. १६ आणि १७ जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री या परिषदेत उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी असतील. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

“संसद नव्हे तर संविधान सर्वोच्च”, उपराष्ट्रपतींच्या विधानावर पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच ‘संसद ही सर्वोच्च आहे’ असं विधान केलं. धनखड यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आक्षेप घेतला. त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या विधानाचं खंडन केलं असून ‘संविधान हेच सर्वोच्च आहे’ असं त्यांनी म्हटलं.“राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड जर म्हणत असतील की संसद ही सर्वोच्च आहे, तर ते चुकीचे आहेत. संविधान ही सर्वोच्च आहे. बहुसंख्याकांकडून संविधानाच्या मूळ तत्त्वावरील हल्ला रोखण्यासाठी मूलभूत संरचनेची मांडणी करण्यात आली” असं चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाजवळ आत्मघातकी बॉम्बहल्ला; पाच जणांचा मृत्यू, २० जखमी

बुधवारी चीनचे शिष्टमंडळ आणि अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाजवळ आत्मघातकी बॉम्बहल्ला झाल्याची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात पाच जणांना मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हा व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यात त्याला अपयश आले, असेही ते म्हणाले. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जोशीमठमध्ये सध्या दोनच हॉटेल पाडणार; इतर घरांना तात्पुरता दिलासा

भूस्खलनामुळे असुरक्षित बनलेली जोशीमठमधील फक्त दोन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राहण्यासाठी असुरक्षित घोषित केलेली कोणतीही घरे अद्याप पाडली जाणार नाहीत, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आर. मीनाक्षी सुंदरम यांनी बुधवारी स्पष्ट केले.भूस्खलनग्रस्त जोशीमठचे समन्वयक अधिकारी सुंदरम यांनी जोशीमठ येथे पत्रकारांना सांगितले की, जोशीमठमधील भूस्खलनाने असुरक्षित झालेली फक्त दोन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण ही हॉटेल परस्परांच्या शेजारीच आहेत. शेजारच्या इमारतींसाठी ते धोकादायक बनले आहेत. मात्र, याशिवाय अद्याप कोणतीही इमारत सध्या पाडली जात नाही.

सिराज-कुलदीपची शानदार गोलंदाजी; श्रीलंकेचे भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य

भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २१५ धावा केल्या. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. नवोदित नुवानिंदू फर्नांडोने शानदार अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारतीय संघाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली.

ईडन गार्डनवर दिसली कुलदीपची जादू! ‘शतकवीर’ शनाकाला बोल्ड करत मोडले अनेक विक्रम

पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेन्द्र चहलला दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने त्याच्या ऐवजी कुलदीप यादवला अंतिम अकरा मध्ये स्थान दिले. या संधीचे सोने करत कुलदीपने तीन गडी बाद करत श्रीलंकेला सर्वबाद करण्यात मोलाची साथ दिली. कुलदीपने कर्णधाराचा विश्वास कायम राखत मागील सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्याआधीच त्याला माघारी पाठवले. ही कामगिरी करताना त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.