आज श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडीचे भारताचे लक्ष्य
अव्वल तीन फलंदाजांना सूर गवसल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या सामन्यात शुभमन गिलच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल.
गेल्या वर्षीच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध द्विशतक साकारणाऱ्या सलामीवीर इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी भारताने शुभमन गिलला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि गिलने विश्वास सार्थकी लावताना ६० चेंडूंत ७० धावांची आक्रमक खेळी साकारली. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करताना आतापर्यंत १६ सामन्यांत एक शतक व पाच अर्धशतके साकारली आहेत. त्याने गेल्या पाचपैकी चार सामन्यांत किमान ४५ धावांचा टप्पा ओलांडला आहे. तो आता कामगिरीत सातत्य राखेल अशी भारताला आशा आहे.
भारताने गुवाहाटी येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना ६७ धावांनी जिंकला. या सामन्यात गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी अर्धशतके, तर विराट कोहलीने शतक झळकावले. त्यामुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ३७३ धावांची मजल मारली होती. भारतीय कर्णधार रोहितने आपल्या फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सर्वच फलंदाज अधिक आक्रमक शैलीत खेळताना दिसत आहेत. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
भारताला गोलंदाजीत सुधारणेला वाव आहे. श्रीलंकेने पहिला सामना गमावला, पण त्यांना ३०६ धावांची मजल मारता आली होती. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला प्रभावी मारा केला. मात्र, अखेरच्या षटकांत दसून शनाकाची फटकेबाजी रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम राखायचे झाल्यास कर्णधार शनाकाला अन्य खेळाडूंची साथ मिळणे आवश्यक आहे.