लवकरचं केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत, त्यामुळे सहा महिन्यापूर्वी एनडीएत दाखल झालेल्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदारांच्या नजरा मंत्रिमंडळ फेर बदलाकडे लागल्या आहेत. कारण शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रीय सत्तेत वाटा मिळणार आहे. पण मंत्रिमंडळामध्ये कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
येत्या 16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत 2023 मध्ये 9 राज्यात होणाऱ्या निवडणूका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या दृष्टीने केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात बदल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे आता कोणाची लॉटरी लागणार आणि कोणाला मंत्री पदावर पाणी सोडावं लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 31 जानेवारीआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रमंडळात लवकरचं खांदेपालट होणार असल्याची राजधानी दिल्लीच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांचं प्रगती पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय अर्थ संकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे, मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं जोर धरलाय.
कुणाला मंत्री पदाची लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार? याविषयी अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण एनडीएचा घटकपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात सत्तेत वाटा मिळणार आहे.
बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद दिलं मिळणार आहे, त्यामध्ये काही खासदारांची नावं आघाडीवर आहेत. राहुल शेवाळे यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.