माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल युनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या शरद यादव यांना समाजवादी राजकारणामुळे लोकप्रियता मिळाली होती. गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी हिने ट्विटरवर त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
गुरुवारी रात्री ९ वाजता शरद यादव यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. गुरुवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
शरद यादव हे मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार झाले होते. तर दोन वेळा मध्य प्रदेशातील जबलपूरमधून ते खासदार होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील बदायूमधूनही ते खासदार झाले होते. शरद यादव भारतातील असे पहिले नेते होते ज्यांनी तीन राज्यातून लोकसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. शरद यादव हे एनडीएचे संयोजक होते पण २०१३ मध्ये पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या संयोजक पदाचाही राजीनामा दिला होता.