अजित पवार यांच्या मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.
दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दौंड साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणतीही अनियमितता नसल्याचा खुलासा केला होता.