मनोरंजनसृष्टीतून पुन्हा एक दुःखद बातमी आली आहे. ‘गुडफेलस’ फेम हॉलिवूड स्टार रे लिओटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ हॉलिवूड स्टार्सच नाही तर चाहतेही हैराण झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी डोमिनिकन रिपब्लिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. रे लिओटाने ‘गुडफेलास’ चित्रपटात मॉबस्टर ‘हेन्री हिल’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना प्रचंड नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती. यासोबतच ते ‘फिल्ड ऑफ ड्रीम्स’साठीही ओळखले जातात.
अनेक कलाकारांनी रे लिओटा यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.आणि सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रे लिओटा यांचं डोमिनिकन रिपब्लिकमध्येनिधन झालं. त्यांची सहकारी जेनिफर अॕलनने सांगितले की, लिओटा डेंजरस वॉटर्स या चित्रपटाचे शूटिंग करत होते. यादरम्यान त्यांचा झोपेतच मृत्यू झाला, मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जोश ब्रोलिनने इन्स्टाग्रामवर अभिनेत्याचा एक फोटो शेअर करत लिहिलंय, ‘माझा मित्र. इतक्या लवकर? का? मला तुझी खूप आठवण येईल. मी तुला गोल्ड्समध्ये पाहण्यासाठी नेहमीच विचार करेन. पुढे काय करायचे आहे,एकत्र काहीतरी कसं शोधायचं याबद्दलचं आपलं बोलणं. नेहमी उत्कृष्ट काम आणि बाकीच्यांपेक्षा नेहमीच वेगळं… होय, मित्रा, मला तुझी आठवण येईल. जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत.असं म्हणत या हॉलिवूड अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. इतकंच नव्हे तर, रे लिओटा यांचं नाव 1988 च्या डोमिनिक आणि यूजीन चित्रपटासाठी गोल्डन ग्लोब नामांकन यादीत समाविष्ट झालं होतं. गेल्या वर्षी, त्यांनी सोप्रानोसच्या प्रीक्वेल चित्रपट ‘द मेनी सेंट्स ऑफ नेवार्क’ मध्ये काम केलं होतं. याशिवाय ‘मॅरेज स्टोरी’ आणि ‘नो सडन मूव्ह’मध्येही ते झळकले होते. यांच्या अशा अचानक जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.