गेल्या कित्येक दिवसांपासून आसाममध्ये पूर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत लाखो लोकं प्रभावित होत आहे. गुरुवारी पावसानं संबंधित घटनेत आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी सरकारी आकडेवारीनुसार, 5.61 लाख लोक अजूनही पूरासारख्या परिस्थितीचा सामना करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गुरुवारी नागाव आणि कामपूर येथे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला.
राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. ASDMA नं सांगितलं की, कछार, दिमा हासाओ, हैलाकांडी, होजई, कार्बी आंगलाँग पश्चिम, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यातील 5 लाख 61 हजार 100 लोकांना पुराचा फटका बसला आहे.
नागाव जिल्ह्यातील सर्वाधिक 3.68 लाख लोकांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी कछार जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख आणि मोरीगाव जिल्ह्यात 41,000 हून अधिक लोक प्रभावित आहेत. गुरुवारी एक आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथक गुवाहाटी येथे पोहोचले. त्यानंतर राज्यातील पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
ASDMA ने एका निवेदनात म्हटलं आहे की, नुकसानीचे त्वरीत मूल्यांकन करण्यासाठी IMCT सदस्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे, जे प्रभावित जिल्ह्यांना भेट देतील. पहिला गट कछार आणि दिमा हासाओ जिल्ह्यांना भेट देईल. तर दुसरा गट दररांग, नागाव आणि होजईला भेट देईल.
ASDMA ने सांगितले की, सध्या 956 गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्ण आसाममध्ये 47,139.12 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अधिकारी सहा जिल्ह्यांमध्ये 365 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 13,988 मुलांसह 66,836 लोक आश्रयस्थानात आहेत. आतापर्यंत 1,243.65 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 5,075.11 लीटर मोहरीचे तेल, 300 क्विंटल पशुखाद्य आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप करण्यात आलं आहे.