लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीय. लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. माझ्या विभागानं मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचं ठरवलं होतं याचं मला समाधान आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी लतादीदी यांचं निधन झालं. आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असं नाव दिलं जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी आज केलीय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण कालच लतादीदींच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत म्हणाले.

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचं स्मृती स्थळ शिवाजी पार्कात उभारण्याची मागणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शिवाजी पार्कात लतादीदी पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मृती स्थळ उभारण्यात यावं. जनतेच्या मागणीचा सन्मान करून तात्काळ हे स्मृती स्थळ निर्माण केलं पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.