विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपाताने? संशय वाढल्याने मुख्यमंत्र्यांचे CID चौकशीचे आदेश
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
राष्ट्रगीत सुरू झालं अन् अख्खी अंतयात्रा थांबली; देशभक्त आजींना अनोखी श्रद्धांजली
राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. यासाठी नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यात एक विशेष घटना पाहायला मिळाली. अंतयात्रेचा कार्यक्रम थांबून काजेगाव ग्रामपंचायतसमोर समूह राष्ट्रगीत गायले गेले.दिवंगत सुमनबाई बोरणारे यांना राष्ट्रगीताविषयी नेहमीच आदर होता. त्या मागील कित्येक वर्षापासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला न चुकता ध्वजारोहणाकरिता शाळेत किंवा ग्रामपंचायतला हजर असत. स्वयंपूर्ण राष्ट्रीय सण साजरा करत तसेच लहान बालगोपाळांना साहित्य व खाऊ देऊन इतिहासाबद्दल माहिती सुद्धा द्यायच्या. त्यांना लेखनाची, वाचनाची तसेच कविता व गीत लिखाणाची, गायनाची आवड होती. आज काजेगाव वासियांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून दिलेली श्रद्धांजली हे खरंच आगळीवेगळी श्रद्धांजली आहे.
चार दिवस भामरागडमध्ये पाणीच पाणी, मोबाईल सेवा सुरू झाल्यानंतर दिसली पुराची दाहकता
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका राज्याच्या सीमेवरील अतिदुर्गम तालुका आहे. गेले चार दिवस पामुलगौतम आणि पुर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा भामरागडला फटका बसून चारही बाजूने गावात पुराच पाणी गेले होते. आज काही प्रमाणात पूर ओसरला असला तरी पर्लकोटाचा मोठा पुल पाण्याखालीच आहे, त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटलेलाच आहे.
आज मोबाईल सेवा सुरु झाल्यानंतर भामरागडच्या पूर परिस्थितीची भीषणता दाखवणारे व्हिडिओ समोर आले आहेत. पर्लकोटा नदीचे पाणी समोरुन तर पामुलगौतम नदीचे पाणी मागच्या बाजूने भामरागड मध्ये शिरले होते. गेले चार दिवस मुख्य बाजारपेठेसह भामरागड गावाचा मोठा रहिवासी भाग पुराच्या पाण्याखालीच होता.
एकाच गावातील 3 मैत्रिणींची आत्महत्या, विष घेत संपवलं जीवन; एका विवाहितेचा समावेश
राज्यासह देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आता शिवणकामला जाणाऱ्या तिन्ही मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील महुली गावात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बिहारमधील नवादा जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. याठिकाणी एक महिला आणि दोन तरुणींनी एकत्र विष घेत आत्महत्या केली आहे. माहुली गावातील रामेश्वर चौहान याची 18 वर्षीय पत्नी राणी देवी, दाहू चौहान यांची 14 वर्षीय मुलगी कांचन कुमारी आणि लेखा चौहान यांची 13 वर्षीय मुलगी आशा कुमारी, अशी मृतांची नावे आहेत. या तिन्ही मैत्रिणी होत्या.तसेच सर्व ठिकाणी तिन्ही सोबतच जात होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
गडकरी आऊट, फडणवीस इन! भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या समितीमध्ये आता एकही मराठी माणूस नाही.भाजपची संसदीय समिती ही पक्षातली सगळ्यात महत्त्वाची समिती आहे. राज्यांमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात कुणाशी युती करायची, याचा निर्णय ही समिती घेते. तसंच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये आणि विधान परिषदांमध्ये पक्षाचा नेता निवडीचं काम ही समिती करते.
शेतीसाठीच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 1.5% व्याज सवलत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सवलत 1.5% वर देण्यास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे 2022-23 ते 2024 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्थांना ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँक, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका यांना 1.5% व्याज अनुदान दिले जाईल.
आता आयपीएलमध्येही भरणार पंडित गुरुजींची शाळा, चंद्रकांत पंडित केकेआरचे नवे प्रशिक्षक
भारताचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित यांची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच याची माहिती दिली.आयपीलच्या आगामी मोसमात चंद्रकांत पंडित केकेआरचे माजी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेतील.
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट मिळालीच नाही? मुंबई हायकोर्टातील अहवालाबाबत मोठी माहिती आली समोर
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये एसीबीनं दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याची बाब समोर आली आहे.संबंधित अहवाल मागील दोन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’नं दिलं आहे. यामुळे आता अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, २०१९ मध्ये अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीनं क्लीन चिट दिली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. पण गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारला नाही. दोन वर्षांपासून हा अहवाल प्रलंबित आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कमांडोंना केंद्राने हटवलं आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डोवाल यांच्या व्हीआयपी सुरक्षेशी संबंधित उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि कमांडंट यांची बदली करण्यात आली आहे.फेब्रुवारी २०२२ मध्ये एका व्यक्तीने अजित डोवाल यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं होतं आणि नंतर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाच्या एसयुव्हीमधून एका व्यक्तीने कडक सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या अजित डोवाल यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर आमिरने घेतली राज ठाकरेंची भेट
बॉलिवुडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. प्रदर्शित झाल्यावर तर या चित्रपटाला बहुतांश प्रेक्षकांनी बॉयकॉट केलं आहे. आता नुकतंच आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. चित्रपटाला बॉयकॉट केल्यासंदर्भात आमिर आपली समस्या घेऊन राज ठाकरे यांच्याकडे आला असल्याचे तर्क नेटकरी लावत आहेत.
SD Social Media
9850 60 3590