एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. या काळात सरकार कोसळण्यापासून ते शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत दोन्ही गटांना वेगळं नाव आणि चिन्ह देण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गटातील नेत्यांनी शिंदेंना धारेवर धरलेलं असतानाच आता शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
बुलढाण्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. नव्या निवडणूक चिन्हाबद्दल बोलताना ते म्हणाले की , आम्हाला खूप मनापासून आनंद वाटतोय की ,बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करण्याचं सौभाग्य आम्हाला 40-50 आमदारांना (शिंदेंसोबत गेलेले आमदार) आणि 12 खासदारांना मिळालं. यासोबतच असंख्य शिवसैनिक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांसोबत काम करून शिवसेना वाढवली, खेड्यापाड्यात तांड्या वस्तीवर भगवा फडकविला, ते आमच्यासोबत आहेत, असं गायकवाड म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, की हे म्हणतात की , ‘आम्ही गद्दार आहोत, आम्ही त्यांचा बाप चोरला. मात्र यांनीच आमचा बाप चोरला. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नाहीच. आता ते निवडणूक आयोगाने सिद्ध करून टाकलं की, आमच्याकडची शिवसेना ही खरी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे.’
गायकवाड पुढे म्हणाले, की ‘त्यांचं दुर्दैव बघा, की ते सांगतात की आज माझ्या बापाचा फोटो लावू नका. माझा बाप चोरला. पण तेच बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाही. स्वतःच्या नावाची शिवसेना स्वीकारली पण वडिलांच्या नावाची शिवसेना स्वीकारली नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमची आहे आणि त्यांचे विचार ठेवून आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या विचाराचं नाव आज आम्हाला या ठिकाणी मिळालं म्हणून मनापासून आम्ही सगळे लोक आनंदामध्ये आहोत’, असं आमदार गायकवाड म्हणाले