वाजत-गाजत वरात आली, सगळी तयारीही झाली; वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यानच नवरीने दिला लग्नास नकार

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून एक धक्कादायक मात्र धाडसी घटना समोर आली आहे. इथे एका नवरीने दारूच्या नशेत आलेल्या नवरदेवाशी लग्न करण्यास नकार दिला. वधूच्या निर्णयामुळे एकच गोंधळ उडाला. तिच्यावर अनेक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. तिला समजावण्याचा प्रयत्न झाला, पण नवरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अशा स्थितीत नवरदेवाला वरात घेऊन लग्न करताच माघारी जावं लागलं.

यासोबतच लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही परत जावं लागले. वधूच्या या पावलाचं खूप कौतुक होत आहे. बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू आहे. राज्यात दारू पिणं हा दंडनीय गुन्हा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बिहार दारूमुक्त करायचा आहे. अशात आता अशा धाडसी निर्णयांच्या मदतीनेच मुख्यमंत्र्यांचं हे स्वप्न साकार होऊ शकतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद नवरदेव आणि वऱ्हाडी लग्न न करताच परतण्याची ही घटना मधुबनी जिल्ह्यातील बसोपट्टी ब्लॉकमधील झितकोहिया गावातील आहे. कटाया मुशारीतील तरुणी काजल कुमारीचं लग्न नेपाळमधील धनुषा जिल्ह्यातील भदरिया गावातील रहिवासी राजू सदा याच्याशी होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नाचा मंडपही तयार होता.

नववधूच्या हातावर मेहंदीही लागली होती. अंगण सजलेलं होतं. वरातीतील लोकांच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यात आले होते. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. ठरलेल्या वेळेवर नवरदेव आणि वराती मंडपात पोहोचले. यानंतर वरमाळेच्या कार्यक्रमासाठी नवरी स्टेजवर गेली, मात्र नवरदेव नशेत असल्याचं पाहून तिने लग्नास नकार दिला.

नवरीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या नवरदेवाकडील लोकांनी नवरीकडच्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, पण धाडसी नवरीचा निर्णय बदलला नाही. अखेर नवरदेवाला लग्न न करताच मंडपातून माघारी परतावं लागलं. मुलीकडच्या लोकांचं म्हणणं आहे की, वरातीत जवळपास १०० लोक होते, यात नवरदेवासह सगळेच नशेत होते.

बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. असं असतानाही दारूबंदी कायदा पायदळी तुडवला जात असल्याच्या बातम्या रोज येत असतात. अशा स्थितीत या धाडसी नवरीने वरात माघारी पाठवण्याचं जे धाडस दाखवलं, ते कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.