आज दि.२८ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

धर्मवीरांच्या गोष्टी एका भागात संपणाऱ्या नाहीत; निर्मात्यांकडून अखेर धर्मवीर 2ची घोषणा! 

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा वर्षपूर्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.27 डिसेंबर 2021 रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला.यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती.’धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग 2024 ला घेऊन येत आहोत’, अशी घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

14 महिन्यांनी अनिल देशमुखांची सुटका, अजितदादांसह राष्ट्रवादीचे दिग्गज आर्थररोड बाहेर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तब्बल 14 महिन्यांनी जेलबाहेर आले आहेत. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, यानंतर अनिल देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

रिलायन्स फाउंडेशन तर्फे स्कॉलरशिप्सची मोठी घोषणा; 2022-23 मध्ये देणार 5100 शिष्यवृत्ती

स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त रिलायंस फाउंडेशनकडून एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन तर्फे 2022-23 या वर्षात तब्बल 5000 UG आणि 100 PG विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स देण्यात येणार आहे. तसंच पुढील दहा वर्षांमध्ये तब्बल 50,000 स्कॉलरशिप्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या स्कॉलरशिप अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांना त्या च्या मेरिट बेसिसवर ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.तसंच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना तब्बल सहा लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांना त्या च्या मेरिट बेसिसवर ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स या क्षेत्रातील PG विद्यार्थ्यांना हि स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

अधिवेशनच्या कामातील विरंगुळा, आमदारांसाठी उभारली मनोरंजनाची सुविधा 

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित आदरतिथ्य करणे तसेच दिवसभरातील कामाचा थकवा दूर करण्यासाठी प्रशासनाने खास मनोरंजनाची व्यवस्था उभारली आहे. सिव्हिल लाईन्स येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानामध्ये मोबाईल डिजिटल पिक्चर थिएटर उभारण्यात आले आहे. 

पिक्चर थिएटरच्या माध्यमातून गाजलेले मराठी चित्रपट पाहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. आमदार निवासस्थानासमोरच हे थिएटर असल्याने याला चांगला प्रतिसाद लाभत असून या मोबाईल डिजिटल  थिएटरचे सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे. यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग अधिवेशनाच्या काळात राबविण्यात आला आहे.

थेट विद्यापीठाकडून मिळणार योगशास्त्राचं प्रमाणपत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने यांनी दिली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव उघड करा; खडसेंचा रोख नेमका कोणाकडं?

फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु न्यायालयाकडून हा रिपोर्ट अमान्य करण्यात आला आहे. या अहवालामध्ये त्रुटी असून,  या प्रकरणात आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा व पुन्हा नव्याने अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील मोठी मागणी केली आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

“मुंबई, महाराष्ट्रातही कर्नाटकचे लोक राहतात…” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटकला खडसावलं

कर्नाटक सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकच्यावतीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक प्रशासनाचा निषेध करणारा ठराव समंत झाल्यानंतर आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी झालेल्या चर्चेला उत्तर दिले. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच कर्नाटकला सडेतोड उत्तर देत असतानाच विरोधकांनाही चिमटे काढले.कर्नाटकामधील एका मंत्र्यांने कालच मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, असे वक्तव्य केले. सभागृहाने याचा निषेध केला आहेच. मी देखील कडक शब्दात याचा निषेध करतो. मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही, ती महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा मुंबईकर हा एकजुटीने उभा राहून त्याला तोंड देतो. कोविडच्या काळातही आपण हेच पाहिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनीही वेळोवेळी मुंबईचे रक्षण केलेले आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई आपल्याला मिळाली आहे.

गुलाम नबी आझाद यांना धक्के, आतापर्यंत १२६ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी; प्रस्थापित होण्याआधीच अस्तित्व धोक्यात?

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत याच वर्षी सप्टेंबर महिन्यात नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांनी आपल्या पक्षाला ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी (DAP)’ असे नाव दिले आहे. नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर सध्या ते जम्मू-काश्मीरमधील आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच अवघ्या काही महिन्यांच्या त्यांच्या पक्षाला मोठे धक्के बसले आहे. पक्षातील काही बड्या नेत्यांची हकालपट्टी केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाला गळती लागली आहे. पक्ष नावारुपाला येण्यापूर्वीच अनेक नेते आझाद यांची साथ सोडत आहेत. याच कारणामुळे आझाद यांचा पक्ष जम्मू-काश्मीरमधील काही प्रांतापुरताच सिमीत राहतो की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.