विराट-रोहित-पंतला धक्का, श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर निवड समितीने काही कठोर निर्णय घेतले आहेत. टी-20 सीरिजमधून रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना स्थान देण्यात आलेलं नाही, तर ऋषभ पंतला टी-20 तसंच वनडे टीममधूनही बाहेर ठेवण्यात आलं आहे. केएल राहुलला उपकर्णधारपदही गमवावं लागलं आहे.

भारताच्या टी-20 टीमचं कर्णधारपद हार्दिक पांड्याला देण्यात आलं आहे, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार आहे. वनडे टीममध्ये रोहित शर्मा कर्णधार म्हणून कायम आहे. हार्दिक पांड्याला वनडे टीमचं उपकर्णधार करण्यात आलं आहे.

दुखापतीमुळे रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धची टेस्ट सीरिज खेळू शकला नव्हता, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धची टी-20 सीरिज खेळेल का नाही, याबाबत साशंकता होती. आज सकाळीच रोहित शर्मा मुंबईत नेट प्रॅक्टिस करताना दिसला होता. कुलदीप यादवचं बऱ्याच काळानंतर टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

ऋषभ पंत टी-20 फॉरमॅटमध्ये वारंवार फ्लॉप होत आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. बांगलादेश दौऱ्यात वनडे सामन्यात द्विशतक करणाऱ्या इशान किशनला दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. वनडे टीममधून शिखर धवनला बाहेर करण्यात आलं आहे.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समितीचा हा शेवटचा निर्णय आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर निवड समितीला बरखास्त करण्यात आलं होतं, पण अजूनही नव्या निवड समितीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे या सीरिजसाठी जुन्या निवड समितीनेच टीमची घोषणा केली आहे.

भारताची टी-20 टीम

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

भारताची वनडे टीम

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.