पैठण तालुक्यातील (Paithan) वडजी गाव हे मोसंबी, डाळींब, भाजीपाला उत्पादक आणि बागायतदारांचे सधन गाव. याच वडजीवर मोठा दरोडा (Robbery) घालण्याच्या इराद्याने शुक्रवारी दरोडेखोर गावात घुसले. त्यांनी जवळपास 40 घरांच्या दराच्या कड्या बाहेरून लावल्या. एका शेतकऱ्याच्या घरी मोठी लूट केली. पण गावकऱ्यांच्या सावधगिरीमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. एवढ्या मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे वडजी गावासह पैठण तालुक्यात या घटनेची जबर दहशत पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पैठण तालुक्यात चोरी आणि दरोड्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यातच आता वडजी येथील भयंकर प्रकाराने अख्खा तालुका हादरला आहे. वडजी शिवारातील सखाराम दामोदर वाघमारे हे आई, दोन मुले, सून, नातू यांच्यासह राहतात. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते झोपी गेले असता पहाटे त्यांना जाग आली. घरात डबे वाजण्याचा आवाज आल्याने ते घरात गेले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच मागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता समोरील बाजूने कडी लावल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी चुलतभाऊ संतोष वाघमारे यांना फोन करून बोलावले व कडी उघडली. यावेळी त्यांना घरातील सर्वच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 7 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याच कळले.
सदर घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनेची माहिती दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.
पोलीस सूत्रानुसार, एखाद्या गावात मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार आहे. मात्र गावातील लोक सावध झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. वडजीत चोरट्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जवळपास 30-40 घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यावरून हे चोरटे किती चौकस होते, हे लक्षात येते.