‘शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणी खेळू नये’ ; विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

अयोध्येतील प्रभू रामचंद्र हा जसा आमच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे तशीच आमची श्रद्धा शेतकऱ्यांच्या घामाशी आहे. त्यामुळे आम्हाला कोणी श्रद्धा शिकवू नये, अयोध्येला आपण बळीराजावरील अरिष्ट दूर करण्याची प्रार्थना करण्यासाठीच गेलो होतो. त्यामुळे कोण दिलासा देऊ शकतो व कोण राजकारण करू शकतो, हे सुज्ञ शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये राजकारण आणून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काल, मंगळवारी नगरमध्ये बोलताना दिले. 

पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट व अवकाळीने प्रचंड मोठे नुकसान केले. वनकुटे येथील बबन काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे, बाबाजी मुसळे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाहणी केली, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे या वेळी उपस्थित होते.  नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या कर्ज परतफेडीसाठी सवलत देऊ, यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाले परंतु अद्याप भरपाई मिळाली नाही, अशी ५८६ कोटीची रक्कम तातडीने नगरमधील शेतकऱ्यांना वर्ग करू, ज्यांची घरे पडली त्यांना निकष बाजूला ठेवून तातडीने निवारा द्या, पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करा, सातबारावर नोंद नसली तरी तलाठय़ांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी व अहवाल द्यावा, मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.