एसटी कर्मचाऱ्यांना आरपारची
लढाई लढू नये : अनिल परब
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना ही आरपारची लढाई लढू नये, असं आवाहन केलं आहे. तसेच, कमिटीचा निर्णय़ येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट कबूल करणं किंवा नाकबुल करणं हे आता योग्य होणार नाही. कारण, आता जर कुठलाही निर्णय घेतला तर तो उच्च न्यायालयाचा अपमान ठरेल. असं देखील परब यांनी सांगितलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात न्यायालायने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे, असं जाहीर केलेलं आहे.
वाढती महागाई विरोधात
काँग्रेसची जनजागृती मोहीम
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत घोषणा केली. १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेचे अपयश, बेरोजगारी तसेच महागाईचे प्रश्न अग्रस्थानी असतील. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी शेती आणि शेतकऱ्यांवर हल्ले, बेरोजगारी, वाढती महागाई या विरोधात लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, असल्याचे म्हटले होते.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून
मलिक यांनी जमीन घेतली : फडणवीस
गेल्या महिन्याभरापासून मुंबईत एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.
चीन पाकिस्तानला
देणार युद्धनौका
पाकिस्तानचे आणि चीन हे दोन्ही देश भारतावर कुरघोडी करण्याकरता सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. या आधी JF-17 हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला चीनने पाकिस्तानला मदत केली होती. आता JF-17 हे पाकिस्तान वायू दलाचा महत्त्वाचे लढाऊ विमान आहे. असं असतांना चीन युद्धनौकांच्या बाबतीतही पाकिस्तानला मदत करत आहे. चीन अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट Type 054 ही पाकिस्तानला देणार आहे. एक युद्धनौका तर पुढील काही दिवसांत पाकिस्तानला मिळणार आहे. तर आणखी ३ युद्धनौका चीन पुढील ३ वर्षात पाकिस्तानकडे सुपुर्त करणार आहे.
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी
निवडणूक कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.
जावेद अख्तर, गुलजार यांना संमलेनामध्ये
सहभागी करुन घेण्यास विरोध
नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार आहे. या संमलेनाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे या संमलेनामध्ये प्रसिद्धी कवी आणि गितकार जावेद अख्तर तसेच गुलजार यांना सहभागी करुन घेण्यास ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवला आहे.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या
मोटारीवर काळे ऑईल फेकले
भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या मोटारीवर काही अज्ञात तरूणांनी काळे ऑईल टाकून ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ सकाळी हा प्रकार घडला. आमदार परिचारक हे मोटारीतून पंढरपूरहून बार्शी येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. वाटेत रिधोरे येथे एका तरूणाने दुचाकी आडवी पाडून परिचारक यांची मोटार अडविली. त्यानंतर लगेचच मोटारीवर समोरच्या काचेवर काळे ऑईल टाकले. या कृत्यामध्ये अन्य काही तरूणही सहभागी झाले होते. यावेळी ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
SD social media
9850 60 3590