भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने गुरुवारी स्पेनच्या डेव्हिड अँटोन गुइजारोला हरवून अबू धाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवव्या फेरीअखेरीस १८ वर्षीय अर्जुनने ७.५ गुणांसह बाजी मारली. अर्जुन सर्व नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला आणि उझबेकिस्तानच्या जाव्होखिर सिंदारोव्हपेक्षा अध्र्या गुणांची आघाडी मिळवत अजिंक्यपद पटकावले. सिंदारोव्हने इराणच्या एम अमिन तबाताबाइैला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.
‘लाइव्ह रेटिंग्ज’ यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अर्जुनने गेल्या काही स्पर्धामध्ये आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले आहे. भारतात नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने ३४ एलो गुणांची कमाई केली होती. अबू धाबीत अर्जुनने सहा विजयांसह तीन गेममध्ये बरोबरी साधली आणि जगातील आघाडीच्या ग्रँडमास्टर्स खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.
अर्जुनने रोहित कृष्णा, दीप सेनगुप्ता, रौनक साधवानी, चीनचा अग्रमानांकित वांग हाओ, अलेक्सांद्र इनडिच (सर्बिया) आणि गुइजारोला यांना पराभूत केले, तर एवगेने टॉमशवके (रशिया), जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट आणि राय रॉबसन यांच्याशी सामने बरोबरीत सोडवले. भारताचे ग्रँडमास्टर्स निहाल सरिन, एस पी सेतुरामन, कार्तिकेयन मुरली, आर्यन चोप्रा आणि ‘फिडे’मास्टर आदित्य सामंत यांनी ६.५ गुणांची नोंद केली.