भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार, तर दोनजण जखमी झाले. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या पोलिसानेही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारणपूरसह अन्य चार शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. सहारणपूर आणि प्रयागराज शहरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी सहा जिल्ह्यांतील शंभराहून अधिक निदर्शकांना अटक केली. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी काही वाहनांची जाळपोळ केली आणि पोलिसांची वाहनेही जाळण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केला.
कोलकात्यात गजबजलेल्या पार्क सर्कस भागात निदर्शनांदरम्यान एका पोलिसाने सव्र्हीस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. त्यात रिमा सिंघा ही फिजिओथेरपिस्ट ठार झाली, तर दोन जखमी झाले. रिमा भाडय़ाच्या मोटरसायकलने प्रवास करीत होत्या. या घटनेनंतर संबधित पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव चेडूप लेपचा असे आहे. दरम्यान, निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हावडा येथील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.
नमाज अदा केल्यानंतर दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. काही जणांनी मशिदीच्या पायऱ्यांवर निषेध फलक घेऊन शर्मा आणि जिंदल यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ही निदर्शने १५ ते २० मिनिटे सुरू होती, त्यानंतर निदर्शक पांगले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या संदर्भात जामा मशिदीचे शाही इमाम म्हणाले की, मशिदीच्या व्यवस्थापनाने असे कोणतेही आवाहन केले नव्हते. निदर्शनांची सुरुवात कोणी केली, हे आम्हाला माहीत नाही. शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी घोषणाबाजी केली. मोठा जमावही होता; परंतु तो लवकरच पांगला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि संत यति नरसिंहानंद यांच्यासह ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात शर्मा, जिंदल यांच्यासह पत्रकार सबा नक्वी यांचेही नाव आहे.