10वीचा निकाल लागल्यानंतर आता 5वी आणि 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली या दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. सन 2020-21 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा!, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.