राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत ही फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांवर वानवडी (Wanwadi ) पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक विशेष शाखा, पुणे शहर), नितेश अरविंद आयनूर ( पोलीस उपायुक्त कार्यालय गोपनीय शाखेतील कनिष्ठ लिपिक), रवींद्र धोंडीबा बांदल (वरिष्ठ लिपिक) आणि गणेश जगतापच्या अज्ञात सहकाऱ्याविरोधात भादवी 409, 420, 467, 468, 475, 476, 474, 472, 471, 466, 167 व 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. संबंधित प्रकार 2017 ते 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसा आरोपी हवालदार गणेश जगताप हे 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचा कामातील हलगर्जीपणा, चुकारपणा यामुळे डिपार्टमेंट अंतर्गत कारवाई करत 2 वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली होती. मात्र डिपार्टमेनेट दिलेली शिक्षाही राष्ट्रपती पदक मिळण्यास अडसर ठरत होती.
हा अडसर दार करण्यासाठी जगताप यांनी पोलीस दलातील कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश आयनूर तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र बांदल यांच्या मदतीने गुन्हेगारी कट करुन सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण केले. त्याच्या आधारे खोटा दस्त तयार केला . त्यावर खोट्या सह्या केल्या. तसेच शिक्के मारत वेतनवाढीची झालेल्या कारवाईचे रेकॉर्ड नष्ट करून टाकले. नष्ट केलेल्या पुराव्यांचा फायदा राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी फायदा घेतला आहे.