मुख्यमंत्री म्हणतात, सरकार चालवणे शिवसेनेची जबाबदारी आहे का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी या सगळ्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे ध्यानात आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाली.

मधल्या काळात विविध घटकातील लोकांनी पवारांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्यांचं निवेदन या घटकांनी पवारांना दिलं होतं. त्यामुळे पवारांनी या घटकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचं सांगितलं जातं. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागाचं नुकसान झालं आहे. केंद्राकडून तोकडी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काय करायचं ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी दुपारी 3.30 वाजता बैठक होणार आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आग्रही आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.