आज दि.२७ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी
करावा आणि शिथीलता द्यावी

लॉकडाउन १ जून रोजी संपत असून तो पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. “रेड झोनमधील गावांना धोका पत्करण्याची गरज नाही. जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र झोपेत असताना सरकार
पडेल : चंद्रकांत पाटील

राज्यात एकीकडे विरोधक वारंवार सरकार अस्थिर करण्यासंबंधी वक्तव्य करत असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सरकार पडणार असल्याचा दावा करत असताना खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं ते म्हणाले आहेत.

कुत्र्याला हायड्रोजन फुग्यांना बांधून
हवेत उडवल्याची धक्कादायक घटना

पाळीव कुत्र्याला हायड्रोजन फुग्यांना बांधून हवेत उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील युट्यूबरने हा व्हिडीओ शूट करत युट्यूबला शेअर केला होता. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे.

डिजिटल नियमावलीबाबत
सुंदर पिचाई यांनी भुमिका केली स्पष्ट

नवीन डिजिटल नियमावलीबाबत Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे.
सुंदर पिचाई यांनी आज (गुरुवार) आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कंपनी स्थानिक कायद्यांचे पालन करण्यास आणि सरकारांशी रचनात्मकपणे जोडले जाण्यास वचनबद्ध आहे. वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार नियामक चौकटी तयार करत असतात.

लस घेतली तरच पगार
मिळेल: मध्यप्रदेश सरकार

लस घेतली नाही तर पगार मिळणार नाही असा अध्यादेश छत्तीसगढमधल्या एका जिल्ह्यातल्या आदिवासी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने काढला आहे. जर लस घेतली नाही तर कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्याचा पगार मिळणार नाही असं या अध्यादेशात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलच्या
दराने गाठली शंभरी

करोना काळात महागाई सामान्यांची पाठ सोडत नसून देशात कासवगतीने पेट्रोल दरवाढ सुरुचं आहे. मुंबईत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरेगावात पेट्रोल १००.०४ तर डिझेल ९१.१७ दराने विकल्या जात आहे. आज (गुरुवार) पुन्हा दर वाढले आहेत. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते.

वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे रेल्वे
स्थानकाची इमारतच कोसळली

मध्य प्रदेशमधील हुरहानपुरमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसल्याने रेल्वे स्थानकाची संपूर्ण इमारतच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय.

मुख्यमंत्री म्हणतात, सरकार
चालवणे शिवसेनेची जबाबदारी आहे का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. सगळ्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली.

शरद पवारांनी घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट

पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना करावयाची मदत, कोरोनाचं संकट, म्युकोर मायक्रोसिसचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, या बैठकीतील अधिकृत तपशील स्पष्ट न झाल्याने या बैठकीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे
तब्बल 200 टन पेरु खराब

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.
परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला
केंद्र सरकारची नोटीस

केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने नव्या कायद्यानुसार देशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवत काही माहिती मागवली आहे. यात कंपनीचं नाव, वेबसाईट, अॅपची माहिती आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांसह भारतातील संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांचे तपशील मागितले आहेत. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपने याच कायदेशीर तरतुदीला दिल्लीच उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यांनी या कायद्यामुळे नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं. केंद्र सरकारने राईट टू प्रायव्हसी मुलभूत अधिकार असून त्याचं उल्लंघन करण्याचा हेतू नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.

आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार
पावसाची शक्यता

ओदिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाला (Yaas Cyclone) फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

योगगुरु रामदेवबाबा
यांच्या विरोधात गुन्हा दाखल

करोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधानं न करण्याचा सल्ला दिला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.