वॉरक्लॉ येथे सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विुगणित करताना पाच सुवर्णपदकांवर नाव कोरले. रविवारी भारताच्या रीकव्र्ह संघांनी एकूण आठ पदकांची कमाई केली.
पुरुषांच्या १८ वर्षांखालील कॅडेट गटात अमित कुमार, विकी रुहाल आणि बिशाल चेंगमय यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने फ्रान्सवर ५-३ अशी मात केली. तर मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत कोमलिका बारी आणि पार्थ साळुंखे यांच्या जोडीने जपानच्या जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. त्याशिवाय २१ वर्षांखालील गटात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोमादेवारा या भारतीय रीकव्र्ह संघाने सुवर्णपदक जिंकले.
महिलांच्या कॅडेट गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
कंपाऊंड आणि रीकव्र्ह अशा दोन विभागांत खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.