ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई ३० या लढाऊ विमानाने आकाशात उत्तुंग भरारी घेतली. इतिहासात नोंद केली जावी असाच हा क्षण होता. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख असतात. त्यांनी ३० मिनिटं भरारी घेतली त्यानंतर हिमालय आणि ब्रह्मपुत्र तसंच तेजपूर खोरं हे त्यांनी आकाशातून पाहिलं.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ज्या सुखोई ३० या विमानातून भरारी घेतली ते विमान ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी चालवलं. ८०० किमी प्रतितास या वेगाने हे विमान चालवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा प्रकारे सुखोईतून उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाचा निकाल तोंडावर, राष्ट्रवादीचा गुगली, महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र?
2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन वळणं येताना दिसत आहेत, त्यातच आता मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजाकारणातल्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो, त्यातच वेगवान घडामोडी घडत असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, आणि या चर्चांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द केले. एवढच नाही तर अजितदादांनी त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफही सोडला आणि ते खासगी वाहनातून निघून गेले.
मुख्यमंत्री शिंदे अयोध्येकडे निघताच घडामोडींना वेग, फडणवीसांची दिल्लीकडे कूच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह जय श्रीराम म्हणत अयोध्येला रवाना झाले आहे. या दौऱ्यात भाजपचे नेते सुद्धा सामील झाले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्लीला जाणार आहे. दिल्लीतून ते अयोध्येत जाणार असल्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह विमानाने अयोध्येला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहे.कर्नाटक निवडणूक समितीच्या बैठकीकरीता दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली येथून ते अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे अयोध्येत दिसणार आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?
‘द कपिल शर्मा शो’ मधून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता, कॉमेडियन म्हणजे सुनील ग्रोवर. त्याचे रिंकू भाभी, गुत्थी आणि डॉ. गुलाटी ही पात्रे चांगलीच लोकप्रिय झाली होती. कपिल शर्मा सोबत झालेल्या वादांमुळे 2018 मध्ये त्याने हा शो सोडला होता. त्यानंतर सुनील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याला अजूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. पण आता पाच वर्षानंतर पुन्हा कपिल शर्मा सोबत काम करताना दिसणार असल्याची शक्यता आहे.
‘…हा करिश्मा मोदी साहेबांचाच’, अजितदादांकडून पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या, पण आज अजित पवार माध्यमांसमोर आले. मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका. मला पित्ताचा त्रास होत असल्याने गाडी थांबवली आणि नंतर घरी आराम केला, तरी नॉट रिचेबल सांगण्यात आले. मी पुण्यातच होतो, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून सध्या वाद सुरू आहे, पण हा वाद सुरू असतानाच अजित पवारांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे. ‘कुणाला काय वाटतं, याचं मला देणंघेणं नाही. ते गेली 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. पक्षाने त्यांचा चेहरा वापरून निवडणुका जिंकल्या आहेत. आज जगभर त्यांचा पक्ष पोहोचला, हा करिश्मा मोदी साहेबांचाच आहे. त्यांच्याच नावावर इतक्या निवडणुका जिंकल्या. नऊ वर्षांनी त्यांची डिग्री काढून काय उपयोग? राजकारणात शिक्षणाचा मुद्दा गौण समजला जातो. राजकारणात अजून शिक्षणाची कोणतीही अट आली नाही’, असं अजित पवार म्हणाले.
दिल्लीचा सलग तिसरा पराभव! राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय
जगप्रसिद्ध आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून यातील11 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा पराभव केला आहे. आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग तिसरा पराभव असून यामुळे सोशल मीडियावर दिल्लीचा संघ ट्रोल होताना दिसत आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर राजस्थान राॕयल्स विरुद्ध दिल्ली कॕपिटल यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सुरुवातीला दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर हे दोघे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरले. यशस्वीने पुन्हा एकदा संघासाठी चांगली कामगिरी केली. यशस्वीने 31 बॉलमध्ये 60 धावा केल्या. तर जॉस बटलरने 51 चेंडूत 79 धावा केल्या. परंतु 9 व्या ओव्हरमध्ये यशस्वीची विकेट पडली. यानंतर फलंदाजांमधून केवळ हेटमेयरच राजस्थानसाठी 39 धावांची कामगिरी करू शकला. इतर कोणत्याही बॅट्समनला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. तर दिल्ली कडून मुकेश यादवने 2 तर कुलदीप यादव आणि रोव्हमन पॉवेलने प्रत्येकी 1 धावा केल्या. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घालून 199 धावा केल्या.
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी गिरीस्थानावर पर्यटकांची मोठी गर्दी
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी गिरीस्थानावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.एकीकडे एन उन्हाळ्यात पाऊस, धुके,थंडी,ऊन ढगाळ वातावरण असे वेगळे पण आल्हाददायक वातावरण पर्यटक अनुभवत आहेत. गिरिस्थळांवर शुक्रवारी दुपार नंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली .आज शनिवारी सकाळपासून वाहनांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर पाचगणी फुलून गेले. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रेलचेल आहे.
केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात हा अपघात घडला. केंद्रीय कायदेमंत्री शनिवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
या अपघातानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही सुरक्षा रक्षक कायदेमंत्री किरेन रिजिजू यांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढताना दिसत आहे.
SD Social Media
9850 60 3590