“त्या माणसाने राज्यात दुहीची बीजं पेरली”, चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला आदेश मिळाला तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिवसेनेतल्या फुटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना जबाबदार ठरवलं. परंतु यावेळी त्यांनी पवारांच्या नावाचा उल्लेख टाळला. नामोल्लेख टाळला तरी त्यांचा रोख पवारांकडे असावा, असं म्हटलं जात आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, “त्या एका माणसाने राज्यात निर्माण केलेला जातीयवाद, नेहमी निर्माण केलेली पक्षीय आणि जातीय फूट राज्यकर्त्यांच्या लक्षात का येत नाही. या फुटीमुळे निर्माण झालेलं पक्षीय नुकसान आपण बाजूला ठेवूया, परंतु यातून भांडणं निर्माण करून काही जण आपला स्वार्थ साधत आहेत.” ज्यांना हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जवळ घेतलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, असा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचे
राज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा, पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या शहरांमध्येही पावसाची शक्यता आहे.
खराब प्रदर्शनामुळं सुनील गावसकर कोलकाताच्या ‘या’ स्टार खेळाडूवर भडकले
आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ९ वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने आरसीबीचा दारुण पराभव केला. पण सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या प्रदर्शनाबाबत जोरदार चर्चा झाली. केकेआरने सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कोलकाताचा नंबर ३ चा फलंदाज मनदीप सिंगवर नाराजी व्यक्त केली. मनदीप सिंग शून्यावर बाद झाला आणि पुन्हा एकदा मागील सीजनप्रमाणे या लीगमध्येही मनदीपने निराशाजनक कामगिरी केली. सुनील गावसकर यांनी केकेआरचा फलंदाज मनदीप सिंगबद्दल बोलताना म्हटलं, तो नेहमी एक फ्रॅंचायजी शोधतो पण त्याने खूप काही केलेलं नाहीय.
पुष्पा जिंदा है! प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली; पुष्पा 2चा जबरदस्त ट्रेलर लाँच
पुष्पाच्या दमदार यशानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा2 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. पॅन इंडिया असलेल्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. प्रेक्षकांची आतुरता जास्त न ताणता पुष्पा 2चा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 8 एप्रिलला अभिनेता अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आधीच मेकर्सनी अल्लू अर्जुनला खास सप्राइज दिलं आहे. पुष्पा: द रूलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
डिसेंबर 2021मध्ये पुष्पा सिनेमा प्रदर्शित झाला. भारतीय प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रेम दिलं. सिनेमाच्या हिंदी सह इतर भाषांमध्ये तुफान यश मिळवलं. सिनेमातील गाणी असोत किंवा डायलॉग सगळेच प्रेक्षकांनी डोक्यावर घतेलं. टीझरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचा खास लुक समोर आला आहे. अब रूल पुष्पा का दमदार डायलॉग पाहायला मिळत आहे.
शिंदेंचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लान, मुख्यमंत्री ठाणे स्टेशनवर दाखल!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अयोध्येला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: ठाणे रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत. 9 एप्रिलला मुख्यमंत्री शिवसेना आमदार, खासदार तसंच मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. यासाठी शिवसैनिक आजपासूनच अयोध्येला रवाना होत आहेत.
ठाणे रेल्वे स्टेशनवर शिवसैनिक ढोल ताशांचा गजरात नाचत गात आनंदोत्सव साजरा करत आयोध्याला निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा, यासाठी भाजप मैदानात उतरली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातले भाजप आमदारही दिमतीला असणार आहेत. अयोध्येमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शिंदेंना बळ देणार आहे.
अनिल अँटनीमुळे ख्रिश्चन समाजाच्या आणखी जवळ जाण्याची भाजपाला संधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी याने काल (दि. ६ एप्रिल) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अनिल अँटनी याच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला केरळमधील ख्रिश्चन समुदायाच्या आणखी जवळ जाण्याची एक संधी यामुळे मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा ख्रिश्चन समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी झटत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल अँटनी यांचा पक्षप्रवेश भाजपाला सुखावणारा आहे. मात्र दुसरीकडे केरळचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी या पक्षप्रवेशानंतर दुःख व्यक्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अँटनीने काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याची चाचपणी सुरू केली. मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनिल अँटनीच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आणि त्यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’, भाजपात प्रवेश
अविभाजित आंध्र प्रदेशचे अखेरचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी आज ( ७ एप्रिल ) भाजपात प्रवेश केला आहे. अलीकडेच किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रेड्डींनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
किरण कुमार रेड्डींनी यापूर्वीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता. २०१४ साली तत्कालीन यूपीए सरकारने आंध्र प्रदेशपासून काही जिल्हे वेगळे करत तेलंगणा या नव्या राज्याची स्थापना केली होती. याच्या विरोधात किरण कुमार रेड्डींनी राजीनामा दिला होता. नंतर रेड्डी यांनी स्वत:चा ‘जय समैक्य आंध्र’ नावाचा पक्ष स्थापन केला.
SD Social Media
9850 60 3590