“स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची…” प्रकाश महाजन यांचा आरोप
आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर मी फडतूस नाही तर काडतूस आहे असं जोरदार प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. अशातच फडतूस, काडतूसच्या राजकारणावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका मांडली एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर त्यांनी एक गंभीर आरोपही केला आहे.“स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे हे महिलांची ढाल पुढे करत आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सोबत काम केलं आहे. सरकार चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संयमी माणसाचं मूल्यमापन करून त्यांना फडतूस म्हणणं योग्य नाही. उद्धव ठाकरेंचा सल्लागार कोण आहे याचा मला प्रश्न पडतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत. हा किती विचित्र प्रकार आहे.”
सावरकर गौरव यात्रेत मुंडे भगिनींनी गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण
भाजप आणि शिवसेनेच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. आज बीड जिल्ह्यातील सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या गैरहजर राहिल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.
पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये तीन नावांवर खल
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. कसब्याचा धडा विचारात घेऊन सावध झालेल्या भाजपकडून उमेदवार निवडीचे निकष ठरवत तीन नावांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. कसब्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेत बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट यांना, तर शहरात बहुजन मतदारांची संख्या लक्षात घेऊन माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या प्रदेश पातळीवर विचारविनिमय सुरू झाला आहे.
काँग्रेसमध्ये फक्त कणाहीनच राहू शकतात; गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर घणाघात
काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांच्या ‘आझाद’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. राहुल गांधी यांच्यामुळेच मला काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले, असे सांगताना आझाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता कणाहीन लोकच राहू शकतात. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना आझाद म्हणाले की, मी एकटाच काँग्रेसमधून बाहेर पडलेला व्यक्ती नाही. माझ्यासारखे अनेक नेते, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमधून बाहेर पडले. एकदा का तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलात की, तुमच्याकडे कणा राहत नाही. त्यांच्या आदेशानुसार तुम्हाला वागावे लागते. आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ‘डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते ए.के अँटनी यांच्या मुलाचा भाजपात प्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के अँटनी यांचा मुलगा केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते पीयूष गोयल, वी. मुरलीधरन आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला. अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख होते.
दुसरीतला मुलगा आई वडिलांना म्हणाला ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’; वडिलांकडून पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
देहरादून या ठिकाणी एका सात वर्षांच्या हिंदू मुलाने अचानक त्याच्या घरात आई-बाबांना अम्मी-अब्बा अशी हाक मारू लागला. या गोष्टीचं कारण काय आहे? हे कुटुंबीयांना समजलंच नाही. मग त्यांना लक्षात आलं की या मुलाच्या पुस्तकात Father आणि Mother या दोन शब्दांचा अर्थ अब्बा आणि अम्मी असा दिला आहे. या पुस्तकावर आक्षेप घेत या प्रकरणी वाद निर्माण झाला आहे. मदर आणि फादर या दोन शब्दांचे अर्थ अम्मी ,अब्बू असं शिकवणारं पुस्तक बंद करा अशी मागणी या पालकांनी आणि देहरादूनच्या तमाम हिंदू संघटनांनी केली आहे. हे प्रकरण शाळेतही गेलं आणि त्यानंतर त्यापुढेही गेलं आहे.
SD Social Media
9850 60 3590