कोविड प्रकोपात रेल्वेच्या चाकांना ब्रेक लागला होता. केंद्र स्तरावरील निर्बंधामुळे वर्ष 2021 मध्ये मर्यादित रेल्वे गाड्यांची चाकं गतिमान होती. मात्र, कोविडचे अडथळे दूर सारत भारतीय रेल्वेनं कमाईचा उच्चांक गाठला आहे. तत्काळ तिकीट शुल्कातून 403 कोटी, प्रीमियम तत्काळ तिकीटातून 119 कोटी आणि विविध शुल्कातून 511 कोटींची रेल्वेच्या गंगाजळीत भर पडली आहे. माहितीच्या अधिकारातून ‘रेल्वेची कमाई एक्स्प्रेस’ समोर आली आहे.
पूर्वनियोजन नसताना आपत्कालीन किंवा ऐनवेळी प्रवासाच्या स्थितीत अधिकचे शुल्क देय करण्याद्वारे तीन श्रेणीत प्रवाशी तिकीटे मिळवतात. मध्यप्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर गौर यांनी रेल्वेकडून या तिकिटांबाबत माहिती मागिवली होती. वित्तीय वर्ष 2021-22 सप्टेंबर महिन्याअखेर विविध शुल्कातून 240 कोटी, तत्काळ तिकीटातून 353 कोटी आणि प्रीमियम तत्काळ तिकीटातून 89 कोटी रुपये मिळाले.
वित्तीय वर्ष 2019-20 मध्ये, कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसताना विविध भाड्यांतून 1,313 कोटी, तत्काळ तिकीटातून 1,669 कोटी आणि प्रीमियम तत्काळ तिकीटातून 603 कोटी रुपयांची गंगाजळीत भर पडली होती.
रेल्वेच्या संसदीय समितीने तत्काळ तिकीटावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर टिप्पणी केली होती. निम्न आर्थिक उत्पन्न गटातील प्रवाशांवर यामुळे मोठा आर्थिक भार पडत असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले होते. आपत्कालीन स्थितीत आपल्या निकटवर्तीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कमी अंतराच्या प्रवासासाठी अधिक शुल्काचा भुर्दंड यामुळे पडत असल्याचे समितीने म्हटले आहे. प्रीमियम तत्काळ शुल्काची अंतरानुसार रचना करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.
वित्तीय वर्ष 2021-22 सप्टेंबर अखेरीस पीएनआर नोंदीवरुन, प्रतीक्षा यादीत असलेल्या 52,96,741 प्रवाशांपैकी अंदाजित 32,50,039 प्रवाशांचे बुक स्वयंचलितपणे रद्द करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची पूर्तता करण्यासाठी पर्याप्त स्वरुपात रेल्वे गाड्या उपलब्ध नाहीत. पूर्वनियोजित रेल्वेचे तिकीट आरक्षित केले तरी प्रतीक्षा यादीत समाविष्ट होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे आणि प्रीमियम तत्काळ शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.