पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये
भाजपाला सत्ता राखण्यास यश
पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये निवडणुकांनंतर आता निकाल हाती आले आहेत. पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपाला सत्ता राखण्यास यश आले आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने मोठा पराभव झालेला आहे. पंजामध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवले आहे. उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ यांचेच सरकार पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा
दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार
उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा एकहाती सत्ता सत्ता मिळवणं कठीण आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.
पंजाब मध्ये आम आदमी
पक्षाला स्पष्ट बहुमत
पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले असून आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यायचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं जल्लोष सुरू केला असून नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य देखील केला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांना कुणी पराभूत केलं, यासंदर्भात आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी खुलासा केला आणि त्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे लाभसिंग उगोके.
पंजाबमधला बदल काँग्रेस
पक्षाला धक्का देणारा : शरद पवार
पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाबसोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.
पंजाबचे निकाल ही खूप
मोठी क्रांती : केजरीवाल
पंजाबच्या लोकांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी पंजाबी जनतेचे आभार मानले आहेत. “पंजाबच्या लोकांनी कमाल करून टाकली. आज पंजाबचे निकाल ही खूप मोठी क्रांती आहे. फार मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत पंजाबमधल्या. सुखबीरसिंग बादल हरले, कॅप्टन साहेब हरले, चन्नी साहेब हरले, प्रकाशसिंग बादल हरले, नवज्योत सिंग सिद्धू हरले, विक्रमसिंग मजिठिया हरले. भगतसिंगांनी एकदा म्हटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपण व्यवस्था नाही बदलली, तर काहीही होणार नाही. दु:खाची बाब अशी की गेल्या ७५ वर्षांपासून या पक्षांनी आणि नेत्यांनी इंग्रजांचीच व्यवस्था ठेवली. देशाला लुटत होते. लोकांना जाणून-बुजून गरीब ठेवलं. ‘आप’नं गेल्या ७ वर्षांत ही व्यवस्था बदलली आहे. आम्ही इमानदार राजकारणाची सुरुवात केली आहे”, असं केजरीवाल म्हणाले.
पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल
नम्रपणे स्वीकारतो : नवज्योत सिद्धू
निवडणुकीच्या निकालांबाबत पहिली प्रतिक्रिया देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट केलं आहे. “लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकार करतो. आम आदमी पक्षाचं अभिनंदन!” असं ट्वीट सिद्धू यांनी केलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य करत उलट आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं आहे.
जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे
स्वीकारतो : राहुल गांधी
सर्व निकालांनंतर आता खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातून आम्ही शिकू आणि लोकांच्या हितासाठी काम करत राहू असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत
१२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित
विधानसभेत २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून या क्षेत्रांना पुन्हा एकदा उभारी मिळत आहे. २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नोंदवण्यात आलीय.
उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र
अभी बाकी है : गिरीश महाजन
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते म्हणाले.
SD social media
9850 60 35 90