तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,
अमेरिकेने चीनला दिला इशारा
तीन आठवडे उलटले असले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियन फौजा युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच गोळीबार करत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांतील युद्ध चिघळू नये म्हणून जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. युद्ध थांबावे म्हणून आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देश रशियावर वेगवेगळे निर्बंध लागू करत आहेत. जागतिक पातळीवर या घडामोडी घडत असताना आता रशियाला पाठिंबा दिला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे.
एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला
दिली युती करण्याची ऑफर
एमआयएमनं महाविकास आघाडीला आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याची ऑफर देऊन राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून जरी खोचक निशाणा साधण्यात येत असला, तरी सत्ताधाऱ्यांकडून शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. तसेच, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान देखील जयंत पाटील यांनी दिलं आहे.
औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते
महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही
इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी ही ऑफर धुडकावून लावत एमआयएमवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.
पुण्यामध्ये चक्क बारावीचं
परीक्षा केंद्रच गायब
पुण्यामध्ये बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात चक्क एक बारावीचं परीक्षा केंद्रच गायब झालं आहे. बारावीच्या परीक्षा केंद्राचा हा गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणला आहे. पुण्याच्या टिळक रस्त्यावर एका इमारतीमध्ये राव जूनियर कॉलेज आहे. याठिकाणी बारावीचं अधिकृत परीक्षा केंद्र आहे. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी परीक्षा केंद्रच नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनास आली. याठिकाणी परीक्षा केंद्राचा ठावठिकाणा नाही.
सांगली शहरामध्ये कडक उन्हात
पाऊस, दोन दिवस उष्णतेची लाट
राज्यात उष्णतेची लाट असणार आहे. पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. उन्हाचे चटके अजून वाढणार आहेत. दरम्यान, पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 19 ते 21 मार्च विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. सांगली शहरातमध्ये आज कडक उन्हात पाऊस पडला. सांगली आणि मिरज शहरात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. कडक उन्हामुळे त्रस्त सांगलीकरांना दिलासा मिळाला.
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख,
चिन्मय मांडलेकरने समजावले अँकरला
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात बिट्टाची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयचा परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले. त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
कर्नाटकात बस उलटल्याने अपघात, आठ
जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त गंभीर
कर्नाटकात तुमकूर जिल्ह्यामधील पावागडजवळ बस उलटल्याने हा भीषण अपघात घडला. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, मृतांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तुमकूर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, यामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा
भारतीय संघावर विजय
आजच्या सामन्यामुळे विश्वचषक चषकाचा मुख्य दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या चार संघात स्थान निश्चित केले आहे, सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. भारताने दिलेले २७८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहा गडी आणि ३ चेंडू राखत पार केले. असं असलं तरी भारतीय खेळाडूंनी शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला या विजयासाठी झगडवले. भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं होतं.
तुकाराम बीजेचा सोहळा
देहूत रविवारी रंगणार
कोरोनाच्या महामारीनंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत उद्या (रविवारी) तुकाराम बीजेचा सोहाळा साजरा होणार आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा असणार आहे. या निमित्ताने देवस्थान प्रशासनाकडून जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. याबरोबरच तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहे. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वैकुंठ स्थान मंदिरासमोर भजनी मंडपात वैकुंठ सोहळा कीर्तन होईल. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देहूत दाखल होणार आहेत.
SD social media
9850 60 35 90