महाराष्ट्रातील प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात तरुणांचे मोठ्या प्रमाणात रोजगार थांबले आहेत. यावर बुलढाणा जिल्ह्यातील गावकऱ्यांनी चक्क आपल्या गावात “आमचं गावही गुजरातला न्या!” असे आगळे वेगळे फलक लावले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या हिवरा बुद्रुकच्या गावकऱ्यांनी गुजरात सरकारकडे साद घातली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेलेत, त्याचप्रमाणे “आमचं संपूर्ण गावच गुजरातला न्या !” अशी मागणी करणारे फलक गावकऱ्यांनी गावभर लावले आहेत. राज्यातील सरकारकडून राज्यात तरुणांना रोजगार देणे शक्य होत नसल्याचे सांगत, गावात बेरोजगारी वाढली आहे.
गावातील तरुणांनी काय करावं ? असा सवाल उपस्थित करत गावकरी संताप व्यक्त करत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेलेत त्याच धर्तीवर आमचं गाव सुद्धा गुजरात राज्यात विलीन करा असा गावकरी संताप व्यक्त केला आहे.
…म्हणून नाशिकमधील 50 गावांना गुजरातमध्ये सामील व्हायचं!
नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमावर्ती भागातील पन्नासहून अधिक गावांनी गुजरातमध्ये विलीन करून घेण्याची विनंती गुजरात सरकारला केली आहे, मूलभूत सुविधा मिळत नाही हे कारण देत या गावकऱ्यांनी हा उठाव केला मात्र ग्रामस्थांचा हा उठाव खरा की खोटा याविषयी शंका कुशंका उपस्थित केली जात आहे.
नाशिक जिल्ह्याच्या महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण,पांगरणे,मालगोंदा यांसह 50 हून अधिक गावांनी महाराष्ट्रातील ही गावे गुजरात राज्यात विलीन करून घ्यावी अशा मागणी गुजरात सरकारकडे केली आहे, ही मागणी पुढे नेण्यासाठी या गावकऱ्यांनी सुरगाणा सीमा संघर्ष समितीची स्थापना करत थेट गुजरात मधील नवसारी जिल्ह्यातील वासंदा तहसील कार्यालय गाठत येथील प्रशासनाला निवेदन सादर केलं. हे गाव गुजरात राज्यात विलीन करून घ्यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्राच्या सुरगाणातून गेलेल्या सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीच्या या पदाधिकाऱ्यांना गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला इतकचं नाही तर त्यांच्याशी याबाबत चर्चा करत हे निवेदन आम्ही वरिष्ठ पातळीवर हाताळून असं आश्वासनही दिलं.