राज्यातील मंदिरं आणि मठांना मोठा इतिहास आहे. या ठिकाणी अनेक परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. काही परंपरा तर शंभर वर्षाहून अधिक जुन्या आहेत. त्यामध्येच कोल्हापूरमधील निजबोध व्यास मठाचा समावेश आहे. या मठातील वीणा गेली 126 वर्ष खाली ठेवण्यात आली नाही.
श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज हे दत्तसंप्रदायातील एक थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत (गल्लीत) राहिले, त्या कारणाने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात. त्यांची निजबोध व्यास मठ ही कोल्हापुरातील गंगावेश येथे आहे.
कोल्हापूर येथील नांदणी या गावी महाराजांनी जन्म घेतला होता. महाराजांचे लहानपणीचे नाव श्रीकृष्ण. कुलदैवत खंडोबाच्या आज्ञेने कृष्णा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेला. तिथून काही दिवसांनी स्वामी समर्थांनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला परतण्याची आज्ञा केली. कोल्हापूरला परत आल्यावर महाराज कुंभार आळीत ताराबाई शिर्के यांच्याकडे वास्तव्यास राहिले. ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर’ या षडरिपूंपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविणे, हेच संतांचे कार्य! आणि तेच महाराजांनी इथे केले. महाराज वास्तव्यास होते त्या ठिकाणाला महाराजांनी वैराग्यमठी असे नाव दिले, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त शेखर आष्टेकर यांनी दिली आहे.
20 ऑगस्ट, 1900 रोजी पहाटे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज वैराग्यमठीत समाधीस्त झाले. महाराजांनी त्यांच्या हयातीत भक्तांसाठी, भजनासाठी व्यास या त्यांच्या भक्ताकरवी दुसरी मठी निर्माण केली. तिचे स्थान जवळच गंगावेस येथे असून ती निजबोध मठी म्हणून ओळखिली जाते. स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला, त्या कारणाने तिला व्यासमठी असेही म्हणतात, असे देखील आष्टेकर यांनी सांगितले आहे. महाराजांचे संपूर्ण चरित्र, त्यांचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून, ते ‘श्रीकृष्ण विजय’ या नावाने प्रसिद्ध झालेले आहे.
या मठीमध्ये प्रवेश करताच समोर सभामंडप आहे आणि चौथऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भ गृहाच्या समोरच संगमरवरी यंत्र, तर दोन्ही बाजूला गरुड देवता आणि हनुमंत यांच्या मुर्ती आहेत. आतमध्ये श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज यांची सिंहासनावर विराजमान अशी पंचधातुंची मूर्ती आहे. खाली ध्यानगृह साकारण्यात आले आहे. तर गर्भ गृहाच्या मागे मठाच्या कार्यक्रमांच्या साठी एक छोटा सांस्कृतिक हॉल असल्याची माहिती शेखर आष्टेकर यांनी दिलीय.
अखंड सुरू असणारी वीणा
या मठात असणारी विणा हे या मठाची परंपरा दर्शवते. ही विणा आजतागायत खाली ठेवण्यात आलेली नाही. श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज यांनी मी स्वतः विणेच्या झंकरामध्ये आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. गेली 126 वर्ष अहोरात्र या विणेची इथे सेवा सुरू आहे. रात्रंदिवस भक्त आळीपाळीने ही विणा घेतात.
रात्रीच्या वेळी देखील रोज वेगवेगळे सेवेकरी येथे असतात. नोंदणी केलेल्यांनाची ही सेवा करण्याची संधी मिळते. विणेची देखभाल दुरुस्ती देखील नियमित केली जाते. त्यामुळे रात्रंदिवस अखंड ही विण्याची सेवा सुरू आहे. त्याचबरोबर रोज संध्याकाळी 7.30 ते रात्री 8.30 दरम्यान भजन सेवा ही देखील अखंडपणे सुरू आहे, असे मंदिराचे विश्वस्त शेखर आष्टेकर यांनी सांगितले आहे.
मठाचा पत्ता :
‘ए’ वार्ड, निजबोध (व्यास) मठी, गंगावेश, कोल्हापूर – 416002