टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. विनोद कुमारला डिस्कस थ्रोमध्ये मिळालेलं पदक क्लासिफिकेशन समितीने रद्दबातल केलं आहे. रविवारी विनोदला डिस्कस थ्रो F -51/52 प्रकारात ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. विनोदने 19.91 मीटर थ्रो केला होता. पोलंडचा पिओटर कोसेविझ याने या स्पर्धेत 20.02 मीटर थ्रो गोल्ड मेडल पटकावलं, तर क्रोएशियाच्या वेलिमिर संदूर याला 19.98 मीटर थ्रो फेकल्यामुळे सिल्व्हर मेडल मिळालं.
विनोदने 17.46 मीटर, 18.32 मीटर, आणि 17.80 मीटर असे पहिले तीन थ्रो केले. यानंतर त्याने 19 मीटरची लाईन क्रॉस करत 19.12, 19.9 आणि 19.81 मीटर थ्रो केले.
F52 या प्रकारात बसून होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळाडूच्या स्नायू शक्तीमध्ये कमतरता, मर्यादित हालचाली, शरिराची मर्यादा किंवा दोन पायांच्या लांबीमध्ये फरक असणं गरजेचं असतं. याशिवाय खेळाडूला मानेच्या कॉर्डला दुखापत, मणक्याची दुखापत किंवा कार्यात्मक विकार असेल तर खेळाडू या स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जातो.
टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत 7 मेडल मिळाली होती, पण विनोद कुमारचं पदक रद्द झाल्यामुळे ही संख्या आता 6 वर आली आहे. शूटर अवनी लेखरा हिला गोल्ड मेडल, डिस्कस थ्रोमध्ये योगेश कठुनियाला सिल्व्हर मेडल, भविनाबेन पटेलला टेबल टेनिसमध्ये सिल्व्हर मेडल, भालाफेकमध्ये देवेंद्र झझारियाला सिल्व्हर मेडल, भालाफेकमध्येच सुंदर सिंगला ब्रॉन्झ मेडल आणि उंच उडीमध्ये निशाद कुमारला सिल्व्हर मेडल मिळालं.