शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या
शिक्षण संस्थांवर ईडीची छापेमारी
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावन गवळी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलं. तसेच भाजपा आमदारावर ईडी लावणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आज ईडीने भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे.
पॕरालिम्पिक मध्ये भारताचा धमाका सुरूच, सुमित आंतिललाही गोल्ड !
टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सोमवारी भालाफेक स्पर्धेच्या F64 क्लास इव्हेंटमध्ये सुमित आंतिलला गोल्ड मेडल मिळालं आहे. सुमित आंतिल याने दोन विश्वविक्रमी थ्रो केले, यामध्ये 68.55 मीटरचा थ्रो सगळ्यात लांब होता.
सुमित आंतिलच्या या मेडलसह आता टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 7 मेडल झाली आहेत. भालाफेक स्पर्धेतच भारताला तीन मेडल मिळाली आहेत. भालाफेकमध्ये देवेंद्र झझारियाला सिल्व्हर मेडल, भालाफेकमध्येच सुंदर सिंगला ब्रॉन्झ मेडल मिळालं.
रामाच्या नावाची ३ हजार ६२६ तर,
कृष्णाच्या नावावर ३ हजार ३०९ गावं
इंडियन एक्सप्रेसने ६ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त गावांच्या नावांचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातील माहितीनुसार, केरळ वगळता देशातील सर्वच राज्यांमध्ये किमान एका गावाचं तरी नाव प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्णाच्या नावावर आहे. या माहितीनुसार २०११ पर्यंत देशभरात रामाच्या नावाची तब्बल ३ हजार ६२६ गावं होती. तर, कृष्णाच्या नावावर ३ हजार ३०९ गावं होती. याशिवाय गणपती बाप्पांच्या नावावर ४४६ आणि गुरुनानक साहेबांच्या नावावर ३५ गावं आहेत.
भारत-पाकिस्ताननं अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये
भारत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं तालिबानी नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझई यांनी सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच तालिबानला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध हवे असल्याचं देखील सांगितलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे
पोलीस ठाण्यात आलेच नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राणे यांना काही दिवस पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून
हकालपट्टी करा : किरीट सोमय्या
अनिल परब यांनी मंत्री असतानाही बेकादेशीर रिसॉर्ट बांधलं व ते माझं रिसॉर्ट असल्याचं सांगून त्याचा मालमत्ता कर देखील भरला. मंत्री महोदय स्वत: बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री परिवार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे करत आहेत. तर, अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेशही दिले गेले आहेत. त्यानंतरही एखादा मंत्री मंत्रिमंडळात कसं राहू शकतो? अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ही आमची मागणी आहे.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.
क्रिकेटचे द्रोणाचार्य प्रशिक्षक
वासू परांजपे यांचे निधन
क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.
थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं
कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय
थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एफ ५२ प्रकारच्या खेळांमध्ये ४१ वर्षीय विनोद कुमार थाळीफेकमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, त्यांनी १९.९१ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई विक्रम रचला. कुमार यांनी पोलंडच्या पिओटर कोसेविच (२०.०२ मीटर) आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर (१९.९८ मीटर) यांच्या नंतर तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकलं होतं. पण त्याचे कांस्यपदक काढून घेण्यात आलं आहे. कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत त्याचं पदक काढून घेण्यात आलं आहे.
चक्रीवादळामुळे अमेरिकेतील
दहा लाख लोक लोक वीजेशिवाय
इडा चक्रीवादळ रविवारी मेक्सिकोतून लुईझियानामध्ये पोहोचलं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेतील एंटरगी लुईझियाना या कंपनीने रविवारी रात्री संपूर्ण न्यू ऑर्लीयन्स महानगर भागाती वीज खंडित केली होती. त्यामुळे तब्बल १० लाख लोक वीजेशिवाय होते.
मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे
थाळीनाद आंदोलन
महाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने थाळीनाद आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंदिरे सुरू करा नाही तर जेलभरो
आंदोलन करू : अण्णा हजारे
मंदिरे सुरू करा नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी आदिती यांनी अण्णांना कोरोनाची परिस्थितीही समजावून सांगितली. मात्र, अण्णांनी आंदोलन मागे घेण्याबाबतचं कोणतंही ठोस आश्वासन आदिती तटकरे यांना दिलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे अण्णाचं आंदोलन होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात लग्न सोहळ्यात
दोन हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती
पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात करोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडाला आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिसांकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी फक्त २०० लोकांची परवानगी असताना दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडल्याचं समोर आलं आहे.
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचा
स्वबळाचा नारा
राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी या आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसने खूप आधीपासूनच स्वबळावर बोलायला सुरुवात केली. मात्र, आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळाची भाषा बोलतोय. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळाचा नारा देणारं सूतोवाच केलंय. आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. ते कोल्हापुरात बैठकीत बोलत होते.
गणेशोत्सवासाठी
नियमावली जाहीर
सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाविकांना गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामसह अन्य व्यासपीठांवर ऑनलाईन स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्यावर्षी भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनाला मुकण्याची शक्यता होती.
SD social media
9850 60 3590