देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. मात्र याचवेळी काही राज्यांमध्ये अजूनही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सावध केली आहे. आरोग्य मंत्रालया (Health Ministry)ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत केरळमध्ये कोरोनाचे 847 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 65,25,879 झाली आहे.
याशिवाय महाराष्ट्रात 171 आणि आंध्र प्रदेशात 75 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात नवीन 171 रुग्णांची भर पडल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 78,72,203 झाली आहे. काही राज्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संपला असा समज करून बेफिकीर वागता कामा नये, असा सतर्कतेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनामुळे आणाखी 59 रुग्णांचा मृत्य झाला. परिणामी, केरळातील एकूणा कोरोनाबळींची संख्या 67,197 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या संशयावरून 22,683 नमुने तपासण्यात आले. सध्या राज्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,464 आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण 1,321 लोकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यभरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 64,51,349 वर गेली आहे.
राज्याचा मृत्यूदर नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 1,43,765 वर गेला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,680 आहे. शुक्रवारी 394 लोक कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 77,22,754 वर पोहोचली आहे.