सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे काही दिवस का होईना पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता आला. बैलगाडा शर्यतीत धावणारे बैल मजबूत शरीरयष्टीचे असतात. पण ते काय खातात, तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या पैलवानासारखेच हे बैल शर्यतीसाठी तयार होतात. आपण अशाच एका शंकरपटातल्या उमद्या पैलवानाला पाहुयात.
शंकरपटात अर्थात बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या या पैलवान बैलाचं नाव आहे हिरा. या पठ्ठ्यानं आतापर्यंत अनेक शर्यती जिंकल्या आहेत. हिराच्या या यशाचं रहस्य दडलंय ते त्याच्या खुराकात. पैलवानाला लाजवेल असा हिराचा खुराक आहे.
हिरा दरदिवशी सकाळी अंडी खातो. हिराला 2 अंडी फोडून ती दुधात मिसळून ते दूध पाजलं जातं. सकाळ-संध्याकाळी 4 लिटर दूध आणि दोन अंडी. त्यासोबत गव्हाच्या पिठात सुकामेवा मिसळला जातो.
त्याचे गोळे करून हिराला खाऊ घातले जातात. त्याशिवाय कडबा हिरवा चाराही असतोच. या रग्गड खुराकामुळेच हिरा ताकदवान आणि चपळ झालाय. औरंगाबादच्या पिसादेवी परिसरात राहणाऱ्या या पखे भावंडांकडे असे दोन बैल आहेत. या 2 बैलांच्या दिवसभराच्या खुराकाचाच खर्च आहे हजार रुपये.
हिरानं याआधी अनेक शर्यती जिंकल्यात. सिल्लोडला एका स्पर्धेत पखेंनी हिराला पाहिलं आणि तब्बल 9 लाख रुपयांना विकत घेतलं. हिरानंही 6 स्पर्धा जिंकून देत मालकाचा विश्वास सार्थ ठरवला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशातही हिरानं जिंकण्याचा रुबाब कायम ठेवला. कुस्ती असो नाहीतर बैलगाडा शर्यत. तगडा आहार हेच पैलवानाच्या यशाचं इंगित असतं. हा पैलवान बैल देखील सज्ज झालाय, पुढचे शंकरपट गाजवण्यासाठी.