वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी त्यांच्या भावजयीला केलेल्या बेदम मारहाणी मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरुन भाजपने थेट महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करताना थंड असलेल्या सरकारने पीडित महिलेवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का? आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी या सरकारचा कडेलोट केला असता, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी महिलेला झालेल्या मारहाणीवरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
वैजापूरच्या शिवसेना आमदाराने महिलेल्या केलेल्या मारहाणीवरून वातावरण आणखी तापले आहे. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टार्गेट करतानाच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज म्हणे महिला धोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण केला आहे. त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारेने भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली.
या प्रकरणात गुन्हा दाखल पण कारवाई शून्य. उलट आज पिडीतेवरच ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल. यावर महिला धोरणकर्ते काही बोलणार का?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमधूनही त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री महोदय आपण अजून किती बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात? आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी या सरकारचा कडेलोट केला असता. हे सरकार गोरगरीबांचं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार-खासदार व त्यांच्या बगलबच्च्यांचं धार्जीणं आहे” अशा कठोर शब्दांत चित्रा वाघ यांनी टीकेचा धडाका सुरु ठेवला.
भाजपच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलात, असा जाब विचारून आमदार रमेश बोरणारे, त्यांचे तीन भाऊ आणि त्यांच्या बायकांनी जबर मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जयश्री बोरणारे असे महिलेचे नाव आहे. जयश्री या आमदार रमेश बोरणारे यांच्या चुलत भावाजय आहेत. या मारहाणप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप या महिलेने केला आहे. मारहाण झालेल्या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. या प्रकरणी आमदारासह 10 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.