मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन बंड केल्यापासून ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. अजूनही ती थांबायचं नाव घेतना दिसत नाही. आता आणखी एका नेत्याने ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि शिवसेना प्रणीत ‘महाराष्ट्र एसटी कामगार सेने’चे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. विजय मालोकारांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
मालोकार यांच्या राजीनाम्याने ठाकरे गटाला मोठा धक्का
विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. 1999 मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढली होती. यात 2004 मध्ये त्यांनी 40 हजार मते मिळत अल्प मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं. तर 2009 मध्ये ‘जनसुराज्य पक्षा’चे उमेदवार म्हणून मालोकारांनी 30 हजार मते घेतली होती. मालोकार यांच्याकडे उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. विजय मालोकार ठाकरे गटाच्या राजीनाम्यानंतर पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
विजय मालोकारांची राजकीय कारकिर्द
अकोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख.
शिवसेनेचे अकोला, यवतमाळ आणि वाशिमचे माजी सहसंपर्कप्रमुख.
1995 मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक.
1999 मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी.
2004 मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव. अपक्ष उमेदवार म्हणून घेतली होती 40 हजारांवर मते.
2009 मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून 30 हजार मतं घेतलीत.