ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळवायचे असतील तर बराच काळ प्रतीक्षा करावी लागते, अशी तक्रार ईपीएफ सदस्यांकडून केली जाते. बऱ्याच जणांचा ईपीएफ क्लेम वारंवार नाकारला जात असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
ही बाब लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचा क्लेम लवकर मार्गी लागावा यासाठी ईपीएफओ कार्यालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचं सर्व स्थानिक ईपीएफओ कार्यालयांना काटेकोर पालन करावं लागणार आहे.
ईपीएफओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक कार्यालयांमध्ये ईपीएफचा दावा वेळेत मार्गी लागावा यासाठी तत्काळ कार्यवाही केली जावी. तसंच ईपीएफचा दावा वारंवार नाकारला जाऊ नये. कोणतंही कारण नसताना अधिकाऱ्यांनी ईपीएफचा दावा रोखून धरणं चुकीचं आहे.
बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या कारणाने कर्मचाऱ्यांचा पीएफचा दावा मंजूर होत नसल्याचं पाहिलं गेलं आहे. कर्मचाऱ्यांना पैशांची आवश्यकता असते त्या वेळी त्यांना पैसे मिळत नाहीत आणि अडचणींचा सामना करावा लागतो. यावर तातडीने उपाय करता यावेत या दृष्टीने ईपीएफओने ही नवीन मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत.
क्लेमची होणार पूर्ण पडताळणी
मनीकंट्रोलने दिलेल्या रिपोर्टनुसार, कर्मचारी जेव्हा पीएफ क्लेमसाठी फाइल सादर करतो त्याच वेळी क्लेमची पूर्ण पडताळणी केली जाणं आवश्यक असल्याचं ईपीएफओने म्हटलं आहे.
क्लेम फाइल करताना त्यात काही कमतरता जाणवली तर पहिल्याच वेळी क्लेम नाकारताना त्याचं कारण सांगितलं जाणं गरजेचं आहे. याआधी क्लेम नाकारताना दर वेळी वेगवेगळी कारणं देऊन दावा नाकारला जात होता. यामुळे पीएफचा क्लेम मिळण्यासाठी उशीर लागायचा आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
दाव्याची प्रक्रिया योग्य वेळेत होणं आवश्यक
ईपीएफओच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत म्हटलं आहे, की एकाच कारणामुळे फेटाळलेले दावे क्षेत्रीय कार्यालयांनी विभागीय कार्यालयाकडे पाठवावेत. क्लेमची प्रक्रिया योग्य वेळेत केली जाणं आवश्यक आहे.
एखादा क्लेम एका वेळी नाकारला गेला असेल आणि त्याच क्लेमसंदर्भात दुसऱ्यांदा दावा करण्यात आला, तर दुसरं कारण सांगून तो दावा फेटाळला जाऊ शकत नाही. क्लेम फाइल करणाऱ्या कर्मचाऱ्याला क्लेममध्ये असलेल्या कमतरता दावा करताना पहिल्याच वेळेस सांगायला हव्यात.
दीर्घ काळापासून केली जाते तक्रार
क्लेमसंदर्भात अनेक तक्रारी अगदी सुरुवातीपासून येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, ईपीएफओच्या स्थानिक आणि विभागीय कार्यालयात क्लेमची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बराच कालावधी लागतो.
क्लेममध्ये अनेकदा आक्षेप घेऊन तो फेटाळला जातो. क्लेममध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, ते कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सांगितले जात नसल्याने त्यांची अडचण होत असते.