केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राजकीय क्षेत्रासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतात. स्मृती इराणी यांनी कन्या जोईश इराणीबाबत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जोईशची एंगेजमेंट झाल्याची खुशखबर स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मुलगी आणि होणाऱ्या जावईबापूंचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतील तुलसी विरानीच्या भूमिकेमुळे स्मृती इराणी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. तब्बल आठ वर्ष चाललेल्या या सिरीअलमुळे स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या.
2001 मध्ये स्मृती इराणी झुबिन इराणी (Zubin Irani) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. 45 वर्षीय स्मृती इराणींना झोहर इराणी (Zohr Irani) आणि जोईश इराणी अशी दोन मुलं आहेत. झोहर वीस वर्षांचा, तर जोईश 18 वर्षांची आहे. जोईश इराणीने नुकतीच बॉयफ्रेण्ड अर्जुन भल्ला (Arjun Bhalla) याच्यासोबत एंगेजमेंट केली.
स्मृती इराणी यांनी जोईश आणि अर्जुन यांचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन गुडघ्यांवर बसून जोईशला प्रपोज करत आहे. त्यासोबतच तिला रिंगही घालत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत जोईश आणि अर्जुन रोमँटिक पोझ देताना दिसतात.
“ही पोस्ट त्या व्यक्तीसाठी, ज्याने आमचं काळीज जिंकलं. वेड्यांनी भरलेल्या आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत. सासऱ्याच्या रुपात तुमची एका अवलियाशी भेट घडेल. माझ्याकडून तुम्हाला अधिकृत वॉर्निंग. गॉड ब्लेस” असं कॅप्शन स्मृती इराणींनी दिलं आहे.